Breaking News

वकील सुनावणीला उशिरा पोहचल्याने विवेक पाटील यांची होळी तुरूंगातच

पनवेल : प्रतिनिधी
बोगस कर्ज प्रकरणामुळे डबघाईला आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांचे वकील जामीन अर्जावरील सुनावणीला उशिरा पोहचल्याने आता ही सुनावणी थेट 1 एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे विवेक पाटील यांचा तळोजा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे. त्यांना आता यंदाचीही होळी तळोजा तुरूंगातच साजरी करावी लागणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी (दि.4) रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी सक्तवसुली संचालनालयातर्फे अ‍ॅड. सुनील गोन्साल्वीस वेळेवर उपस्थित होते, मात्र विवेक पाटील यांचे वकील राहुल ठाकूर सकाळी सुनावणीला उशिरा आल्याने न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता थेट महिनाभराने म्हणजेच 1 एप्रिल रोजी ठेवली आहे.
यापूर्वी साहेब आता सुटणार अशा आशेवर असलेल्या शेकाप कार्यकर्त्यांच्या आशाही आता मावळू लागल्या आहेत. सुरुवातीला साहेब सुटतील यावर विश्वास ठेवणारे कार्यकर्तेही आता विश्वास हरवून बसलेत. त्यातच विवेक पाटील यांच्या वकिलांनाही त्यांच्या जामिनाबाबत गांभिर्य वाटत नसल्याचे आजच्या सुनावणीवरून स्पष्टच झाले आहे.
दरम्यान, सर्वसामान्य ठेवीदारही ‘कर्नाळा एक ढासळलेला बुरूज’ या पुस्तकातील विवेक पाटील यांची प्रकरणे वाचून प्रचंड संतप्त झाले आहेत. त्यामुळे हा भ्रष्ट माणूस कधीच तुरूंगाबाहेर येऊ नये, अशीच प्रार्थना ठेवीदार करीत आहेत तसेच विवेक पाटील यांच्यासोबत या कृत्यात सहभागी असलेल्या त्यांच्या मुलासह सर्व इतर जबाबदार व्यक्ती कधी पकडल्या जातील आणि कधी शिक्षा भोगतील हाही प्रश्न त्यांना पडला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply