उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रातील तळोजा फेज 1, तळोजा फेज 2, कोयनावेळे आणि घोट येथील स्मशानभूमी अंतर्गत कामे करण्यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. या कामांसाठी निधी मिळण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार तब्बल 10 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजुरी केला आहे.
महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेंतर्गत पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा फेज 1 भूखंड क्रमांक 10 सेक्टर 15, तळोजा फेज 2 (पेंधर), कोयनावेळे आणि घोट येथील स्मशानभूमी अंतर्गत कामे करण्यासाठी शासनाने निधी देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार तळोजा फेज 1 भूखंड क्रमांक 10 सेक्टर 15 येथील स्मशानभूमीसाठी दोन कोटी 75 लाख रुपये, तळोजा फेज 2 (पेंधर)करिता दोन कोटी रुपये, कोयनावेळेसाठी दोन कोटी 75 लाख रुपये आणि घोट येथील स्मशानभूमीकरिता दोन कोटी 50 लाख रुपये असा एकूण 10 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे आणि त्या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
परिसराचा झपाट्याने विकास होत असताना त्या ठिकाणी नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर सतत प्रयत्नशील असतात. मागील आठवड्यात पनवेलमधील तीन रस्त्यांच्या विकासासाठी पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आता पुन्हा आणखी एका विकासकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.