ऑक्सफर्ड विद्यापीठ, अॅस्ट्राझेनेका ही औषध कंपनी तसेच भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नांतून निर्माण केल्या जाणार्या कोरोनावरील लशीच्या अखेरच्या टप्प्यातील मानवी चाचण्या बुधवारी जगभरात थांबवण्यात आल्या. भारतातही औषध महानियंत्रकांनी बजावलेल्या नोटिशीनंतर गुरूवारी संबंधित चाचण्या थांबवण्याचा निर्णय सिरम इन्स्टिट्यूटने घेतला. परंतु चाचण्या थांबवण्याच्या या घडामोडीकडे आताच मोठा अडथळा म्हणून पाहता कामा नये. लस उत्पादन प्रक्रियेत चाचण्या थांबवल्या जाणे ही सामान्य घटना असते. त्यामुळे सुयोग्य फेरविचाराअंतीच त्याबद्दल निष्कर्ष काढणे योग्य ठरेल.
ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून विकसित केल्या जात असलेल्या कोव्हिशील्ड नावाच्या लशीकडे अवघ्या जगाचे डोळे लागलेले होते व आहेत. सर्वाधिक सुरक्षित व यशस्वी होण्याची शक्यता वाटणार्या संभाव्य लशींपैकी ही एक प्रमुख लस आहे. परंतु अखेरच्या टप्प्यातील मानवी चाचण्यांमध्ये ब्रिटनमध्ये एक स्वयंसेवक लशीचा डोस दिल्यानंतर अकस्मात आजारी पडल्याने बुधवारी या लशीच्या अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिल येथील चाचण्या थांबवण्यात आल्या. भारतात मात्र सिरम इन्स्टिट्यूटने तसे न केल्याने औषध महानियंत्रकांनी इन्स्टिट्यूटला नोटिस बजावली. त्यानंतर गुरूवारी सिरम इन्स्टिट्यूटनेही चाचण्या थांबवण्याचा निर्णय जाहीर केला. या घडामोडीने जगभरातील सर्वसामान्य भांबावून जाण्याची शक्यता आहे. मात्र अनेक शास्त्रीय व औषधनिर्मिती उद्योगाशी संबंधित प्रकाशनांनी अशातर्हेने चाचण्या थांबवल्या जाणे ही लसनिर्मिती प्रक्रियेतील सामान्य घटना आहे, असे म्हटले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. लसनिर्मिती प्रक्रियेत मानवी चाचण्या सुरू असताना कुठल्याही स्वयंसेवकात गंभीर आजाराची लक्षणे दिसून आल्यास चाचण्या थांबवून संबंधित आजाराचा दिलेल्या लसीशी संबंध आहे का याची कसून तपासणी केली जाते. पुरती खातरजमा केल्यानंतरच चाचण्यांना पुन्हा हिरवा कंदिल मिळतो. कोरोनावरील लसीच्या बाबतीतही त्याच प्रक्रियांचे पालन केले जाते आहे. ब्रिटनमधील स्वयंसेवकामध्ये जो आजार दिसून आला आहे त्याचा दिलेल्या लसीशी संबंध आहे का याची एका स्वतंत्र गटाकडून चौकशी केली जात असल्याचे अॅस्ट्राझेनेकाने म्हटले आहे. चाचणीत सहभागी होणार्या स्वयंसेवकांपैकी कुणा न कुणामध्ये अशाप्रकारे आजार उद्भवणे हे स्वाभाविक असते. फक्त तो लसीशी संबंधित नसल्याची खातरजमा करावी लागते. तशी ती नेहमीच केली जाते. कोरोनावरील लस उत्पादनाच्या प्रयत्नांत अॅस्ट्राझेनेकाचे नाव सुरूवातीपासूनच आघाडीवर राहिले आहे. अॅस्ट्राझेनेकाने चाचण्या थांबवण्याचा निर्णय जाहीर करतानाच या कंपनीसह अन्य आठ कंपन्यांनी सुरक्षिततेची पूर्ण खातरजमा केल्याशिवाय लसीच्या मानवी चाचण्या पुढे सुरू करणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा पुन्हा तेथील अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर महिन्याआधी लशीला मंजुरी देण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच अमेरिकेत लसीसंदर्भात काहिसे साशंकतेचे वातावरणही निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घडामोडीमुळे लसनिर्मिती प्रक्रिया सर्व नियमांचे व पूर्वापार चालत आलेल्या टप्प्यांचे पालन करीतच सुरू असल्याची ग्वाही कंपन्यांकडून दिली गेली आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मात्र अद्याप या घडामोडीवर काहीही भाष्य केलेले दिसत नाही. या घडामोडीचा लस उपलब्ध होण्यावर काय परिणाम होईल हे काही दिवसांत स्पष्ट होईल. तोवर त्याविषयी अकारण निराशाजनक निष्कर्ष काढण्याची घाई निश्चितच करता कामा नये.