पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर
करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंचे मंगेश शेलार यांना आदर्श सरपंच म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीत उत्कृष्ट काम केल्या बद्दल त्यांना शुक्रवारी (दि. 8) झी 24 तास तर्फे पालक मंत्री उदय सामंत यांचे हस्ते आमदार प्रशांत ठाकूर यांचे उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उलवे येथे शुक्रवार (दि. 8) विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडच हा कार्यक्रम झी 24 तासने आयोजित केला होता. या वेळी पालक मंत्री उदय सामंत, आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. या कार्यक्रमात करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंचे मंगेश शेलार यांना आदर्श सरपंच पुरस्काराने गौरवण्यात आले. करंजाडे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून ग्रामपंचायतीवर शेकापची एक हाती सत्ता होती. मात्र मागील वर्षी सरपंच मंगेश शेलार यांचे नेतृवाखाली भाजपने शेकापची सत्ता उलथून लावली आणि ग्रामपंचायतीवर भाजपचे 11 पैकी 10 सदस्य निवडून आले. सरपंच मंगेश शेलार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकून आल्यानंतर दुसर्या दिवसापासून कामाला सुरूवात केली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली कामाचा पाठपुरावा सुरू केला.
वर्षभरात करंजाडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या विकासकामांमध्ये प्रामुख्याने करंजाडे गावातील प्रवेशद्वार, रुग्णवाहिका सेवा, गणेश नगर ते टाटा पॉवर रस्त्याचे काँक्रिटी करण डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सभा मंडप बांधकाम, ग्रामपंचायत हद्दीत ओपन जिम, करंजाडेतील तलावातील गाळ काढणे, गणपती विसर्जन घाट बांधणे, करंजाडे गावात शौचालय बांधणे, शिवमंदिर येथे सार्वजनिक शौचालय बांधणे, सेक्टर 6 करिता 150 एमएलटी पाणी पाईपलाईन जोडण्याचे काम पूर्ण, करंजाडे वसाहतीतील सोसायटीत तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस, गणेश नगर अंतर्गत गटारे दुरुस्त करणे, गावदेवी आदिवासी वाडी येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे, करंजाडेतील मुकरीची आदिवासी वाडी येथे शौचालय बांधणे, शिवमंदिर रस्त्याचे काँक्रिटीकरण, यासारखी विविध 31 विकासकामे मार्गी लावण्यात करंजाडे ग्रामपंचायतीला यश आले आहे. तर करंजाडेतील शिवमंदिर येथून पनवेल शहराला जोडणार्या पुलाच्या कामासाठी पाठपुरावादेखील सुरू आहे.