खालापुर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी (दि. 22) दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक घेऊन रसायनी हद्दीतील रीस गावाजवळ दिशा दर्शक कमान उभारण्यात आली. या दोन तासांत गर्डर बसविण्याचे काम यशस्वी झाल्याने प्रवासी, वाहन चालक व रस्ते विकास महामंडळाच्या कर्मचार्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
पनवेलपासून 13किमी व कळंबोली पासून 17 किमी अंतरावर ही कमान उभारण्यात आली आहे. त्याकरीता ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्यासाठी द्रुतगती महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक बुधवारी दोन तासांकरिता पुर्णपणे बंद करण्यात आली होती. राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (चडठऊउ) तर्फे हे काम करण्यात आले. या ब्लॉकच्या काळात सर्व प्रकारची अवजड व माल वाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गावरील पाली ब्रिज या ठिकाणी थांबण्यात आली होती, तर हलकी चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलनाका (सावरोली फाटा) येथून मुंबई-पुणे महामार्गावरुन मुंबईकडे वळवण्यात आली होती. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर मुंबई बाजूकडे जाणार्या वाहनांची गर्दी झाली होती. मात्र महामार्ग पोलिसांनी चांगले नियोजन केल्याने वाहतुकीला कुठेच अडथळा निर्माण झाला नाही.