आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी आणि पाठपुरावा आला कामी
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा मजकूर येथील प्राचीन शिव मंदिर जवळ सभागृह बांधण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. याकामी आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुरावा कामी आला आहे.
महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेंतर्गत पनवेल महानगरपालिका हद्दीतील तळोजा मजकूर येथील प्राचीन शिवमंदिर जवळ सभागृह बांधणे व परिसर सुशोभिकरण करण्यासाठी पाच कोटी रूपये निधीची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने या विकास कामासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मंजूरी दिली असून तसा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
तळोजा मजकूर येथील प्राचीन शिव मंदिर प्रसिद्ध आहे, त्यामुळे याठिकाणी होणारे विविध कार्यक्रम आणि परिसराचे महत्त्व पाहता या ठिकाणी सभागृहाची आवश्यकता होती. आता ती आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण होणार असून या ठिकाणचे महत्व अधिक वाढणार आहे. त्यामुळे हा निधी मंजूर झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.