Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम करण्याची संधी मला द्यावी -खासदार श्रीरंग बारणे

पनवेल : रामप्रहर वृत्त
गेल्या दहा वर्षांपासून मी या मतदारसंघात काम केले आहे. त्यामुळे आपले मत वाया न जाऊ देता लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम करण्याची संधी मला पुन्हा एकदा द्यावी, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी (दि.25) पनवेल कोळीवाड्यात आयोजित प्रचार सभेत केले.
या वेळी भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी, नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान म्हणून पाहिजे असतील, तर श्रीरंग बारणेही पुन्हा खासदार झाले पाहिजे ही आपल्या सर्वांची जिद्द असल्याचे प्रतिपादन करून ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. या अनुषंगाने पनवेल ग्रामीण भागात गुरुवारी झालेल्या प्रचार दौर्‍याला व चौकसभांना मतदार, नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या दिवसभराच्या प्रचाराची सांगता पनवेल कोळीवाड्यातील सभेने झाली. या सभेवेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कोळी लोकांची शान असलेली लाल गोंड्याची टोपी परिधान केली होती. कोळी समाजाच्या वतीने या सर्व मान्यवरांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
दरम्यान, मान्यवर पनवेल शहरात दाखल होताना भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता. बाईक रॅलीला गार्डन हॉटेलपासून सुरुवात झाली व सांगता पनवेल कोळीवाड्यात झाली. रॅलीदरम्यान खासदार श्रीरंग बारणे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंंबेडकर आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. मान्यवर उरण नाक्याजवळील सभेच्या ठिकाणी पोहचले असता त्यांचे ढोल ताशाच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले.
या सभेला भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, तालुकाप्रमुख रूपेश ठोंबरे, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, मुकीत काझी, समीर ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, नीता माळी, महिला मोर्चा शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, भाजप नेते संजय जैन, संजय भगत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, हारू भगत, राजेश पाटील, विराज गायकवाड, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, केदार भगत, मयुरेश खिस्मतराव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी भाषणात म्हटले की, देशभरात सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आणि आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये पुढाकार घेत प्रकल्पग्रस्तांसह नागरिकांना न्याय देण्याचे काम करीत आहेत. आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून केवळ घोषणा देण्याचे नाही, तर प्रत्यक्षात काम करीत आहोत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकालाही माहीत आहे की, यंदाही मोदींजीचेच सरकार येणार आहे. देशातील विरोधी पक्षांकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही, चेहरा नाही आणि त्यांचे कामही नाही. त्यामुळे आपले मत वाया घालवू नका. आपल्यासमोरील उमेदवार अपरिचित आहेत. मी नऊ निवडणुका लढलो असून गेल्या तीस वर्षांत माणसे जोडण्याचे काम केले तसेच खासदार म्हणून गेली दहा वर्षे मतदारसंघामध्ये काम करून मतदारांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ केला आहे. त्यामुळे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होत 13 मे रोजी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम करण्याची संधी द्यावी. मी भविष्यकार नाही, पण प्रचंड मताधिक्क्याने निवडून येणार हा विश्वास आहे.

नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी श्रीरंग बारणे यांना खासदार करा -आमदार प्रशांत ठाकूर
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, देशाला दिवसरात्र न थकता काम करणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपात लाभलेला आहे. नागरिकांनीही आपल्या मनात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार याची खूणगाठ बांधलेली आहे. त्यामुळे मतदारांना फक्त मतपेटीपर्यंत न्यायचे आहे. खासदार असावा तर श्रीरंग आप्पा बारणेंसारखा याचा आपल्याला अभिमान वाटेल असे काम त्यांनी केले आहे. सर्वांना पाठबळ देण्याचे काम ते करीत असून केंद्रासह राज्य सरकाचा निधी जास्तीत जास्त विकासकामांसाठी कसा मिळेल यासाठी मेहनत घेत आहेत. आपल्या परिसरात होणारा विकास हा कायम होताना पहायचा असेल, तर पुढची पाच वर्षे नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान आणि श्रीरंग बारणे यांना पुन्हा खासदार करावे लागेल. त्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहचा. सर्वांनी मिळून प्रचार करा. देशात गेल्या दहा वर्षांत जो विकास झाला तो फक्त ट्रेलर होता. खरा विकास हा येणार्‍या काळात आपल्याला पहायला मिळणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयी करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांना विजयी करा.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply