Breaking News

महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरेंचा विजय निश्चित -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पेण : प्रतिनिधी
पेणमधील बाळगंगा धरण योग्य प्रकारे करून या भागाच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम येत्या काळात होणार आहे. येथे आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशिल पाटील यांची फेविकॉलसारखी मजबूत जोडी जमली आहे. यामुळे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.26) येथे केले.
रायगड लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ पेण येथील नगरपालिकेच्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोदी सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती देतानाच विरोधकांच्या निष्क्रियतेवर हल्लाबोल केला. मागच्या काळात पेणला पाणी देण्याचा निर्णय आपण घेतला होता, मात्र मध्यंतरीच्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने त्याला स्थगिती दिली. आपले सरकार आल्यावर आपण ती दूर केली. आपण येथील योजना तर पूर्ण करणारच आहोत, शिवाय बाळगंगा धरणातून पेणच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणार आहोत. त्यामुळे चिंता करण्याचे काही काम नाही. सगळे प्रश्न सोडवले जातील, असे ते म्हणाले.
या सभेस राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, उमेदवार खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील, भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार धैर्यशिल पाटील, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सरचिटणीस महेश मोहिते, मिलिंद पाटील, जि.प.च्या माजी अध्यक्ष नीलिमा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रितम पाटील, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दयानंद भगत, शहर अध्यक्ष जितेंद्र पाटील, मनसेचे जितेंद्र पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश पाटील, महेश पोरे आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे सभेला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले की, एकीकडे विश्वगौरव, विकासपुरुष नरेंद्र मोदी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली असलेली महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वखालील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रासप, आरपीआय, पीआरपी, मनसेची महायुती, तर दुसरीकडे राहुल गांधींची 26 पक्षांची खिचडी आहे. महायुतीला मोदीसाहेबांचे इंजिन आहे. हे केवळ देशातच नव्हे; तर जगात शक्तिशाली इंजिन आहे. या इंजिनाला घटक पक्षांचे डब्बे असून यामध्ये दीन, दलित, गरीब, भटक्या विमुक्त जाती-जमाती, शेतकरी, आदिवासी या सर्वांना बसण्याची जागा असून ही विकासाची गाडी आहे. या गाडीमध्ये सर्वांना बसवून सबका साथ, सबका विकास करीत गाडी पुढे जात आहे. ज्या क्षणी तुम्ही सुनील तटकरे यांना मत देता तेव्हा या इंजिनाला रायगडच्या विकासाचा डब्बा जोडला जाईल. विरोधी पक्षाकडे एकच इंजिन असून त्यांच्याकडे डब्बे राहिले नाहीत, मात्र या इंजिनामध्ये त्यांच्याच नातेवाईकांना जागा आहे. इंडिया आघाडीतील प्रत्येक पक्ष आपापले प्रभूत्व सिद्ध करण्याच्या मागे असून यामुळे त्यांचे इंजिन बंद पडले आहे. अशावेळी देशाला एकच पर्याय आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्यांनी या देशाला विकासाकडे नेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वखालील सरकारने विविध लोकोपयोगी योजना आणल्या असून 10 वर्षांत देशातील 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले आहेत. 20 कोटी लोक जे झोपडीत राहत होते त्यांना पक्की घरे मिळाली. 50 कोटी घरांमध्ये गॅस पोहचविला गेला. 55 कोटी लोकांसाठी शौचालयाची व्यवस्था करण्यात आली. 60 कोटी लोकांच्या घरी शुद्ध पाणी पोहचवले. 55 कोटी लोकांना पाच लाख रुपयांपर्यंतचा इलाज आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून मोफत देण्यात आला. 60 कोटी तरुणांना 10 लाखांपर्यंतचे मुद्रा लोन विना तारण आणि विना गॅरेंटर दिले. यामध्ये 31 कोटी महिला आहेत. 80 लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये देऊन महिलांना आपल्या पायावर उभे केले. विमानतळ, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, सरकारी जागा अशा अनेक ठिकाणी महिला बचत गटांना स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. 2026नंतर महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के महिलांना प्रतिनिधित्व मोदीजींमुळे मिळणार आहे. कारागिरांसाठी विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून 14 हजार कोटी रुपये देऊन पारंपरिक व्यवसायात आधुनिकता आणण्याचे काम मोदीजींनी केले. आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी 25 हजार कोटी रुपयांची योजना आणून गाव, खेडी, वाड्या, पाड्या, वस्त्यांवर रस्ते, वीज, पाणी, शिक्षण या सुविधा पोहचविण्याचे काम मोदी सरकारने केले. आता तर मोदीजींनी प्रधानमंत्री सूर्य घर योजना आणली असून या योजनेमुळे 300 युनिट मोफत विजेचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. त्यांनी किसान सन्मान योजना आणली. राज्य सरकारनेही शेतकर्‍यांसाठी योजना आणली. मासेमारी करणार्‍यांसाठी मोदी सरकारने मंत्रालय सुरू करून नीलक्रांती योजना आणली. यातून कोळी बांधवांना मदत करण्याचे काम होत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
जगातील सगळ्यात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था भारताची असल्याचा निर्वाळा इंटरनॅशनल वॉलेंट्री फंडाने दिला आहे. गेल्या 10 वर्षांत देशाची अर्थव्यवस्था 11 क्रमांकावरून पाचवर आणण्याचे काम मोदी सरकारने केले. भविष्यात ती तिसर्‍या स्थानी येणार आहे. अर्थव्यवस्था निर्माण होताना रोजगार निर्मिती, बंदरे विकसित होतात, रस्ते-महामार्ग विस्तार होतो, हवाई वाहतूक विस्तार होतो, गरिबांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध होतात. रस्त्याचे जाळे निर्माण करण्याचे काम होत असून अशी अनेक कामे मोदीजींच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहेत. कोरोना काळात देशाला सावरण्याचे काम मोदीजींनी केले. स्वदेशी लस निर्माण करून 140 कोटी जनतेपर्यंत लस पोहचविण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मागच्या वेळी भाजपच्या मतांवर निवडून आलेले अनंत गीते आता भाजपवर टीका-टिपण्णी करीत आहेत, परंतु हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी खरी शिवसेना आमच्यासोबत आहे. ज्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला, त्यांच्याबरोबर जनता जाणार नाही हे लक्षात ठेवा, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आमदार रविशेठ पाटील आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांची दोस्ती पाहून आम्ही अचंबित झालो आहोत. आगामी काळात हे दोन्ही नेते योग्य ठिकाणी दिसतील, असा शब्द या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पेणच्या जनतेला दिला. देशात पुन्हा मोदीजींना संधी देण्यासाठी रायगडमधून सुनील तटकरे यांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी मंत्री उदय सामंत, रवींद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी नगराध्यक्ष प्रितम पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील आदींचीही भाषणे झाली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply