खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
कळंबोली : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसरात बीडमधील नागरिक वास्तव्यास आहेत. या अनुषंगाने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप मित्रपक्ष महायुतीच्या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांच्या समर्थनासाठी मंगळवारी (दि.30) कळंबोली येथे बीडवासीयांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला.
महाराष्ट्रात भाजप वाढविण्यासाठी स्व. गोपीनाथ मुंडेसाहेबांनी अपार कष्ट घेतले. त्यांनी केलेले कष्ट फेडण्याची आपल्याला एक संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करीत पंकजाताईंना लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून द्याल असा विश्वास मला वाटतो, असे या मेळाव्याला संबोधित करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले. खासदार प्रीतम मुंडे यांनीही मार्गदर्शन केले.
या मेळाव्याला भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, भगवानराव ढाकणे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य प्रवक्ते प्रवीण घुगे, बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय गोल्हार, भाजप कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, माजी नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, काकासाहेब कुत्तरवडे, युवा नेते अजय धोंडे, बाबरीशेठ मुंडे, बीड जि.प. माजी सभापती महेंद्र गर्जे, सदस्य रामदास बडे, सुरेश उगलमुगले, अर्जुन मिडके, सुनील खाडे, युवा नेते विनायक मुंडे, खांदा कॉलनी भगवानबाबा वामनभाऊ सेवा मंडळ अध्यक्ष हरिदास वनवे, भाजप पनवेल शहर माजी उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे, देवदास खेडकर यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बीडवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.