Breaking News

शेकापला उतरती कळा -खासदार सुनील तटकरे

अलिबाग : प्रतिनिधी
आमदार जयंत पाटील यांनी शेकापची धुरा संभाळल्यापासून या पक्षाला उतरती कळा लागली. आता तर लोकसभा निवडणुकीत शेकापचा उमेदवार दिसणे बंद झाले आहे. शेकापचे दुकान बंद होत आले असून अर्ध शटर खाली आले आहे. 7 मेनंतर उरलेले शटर खाली करून त्याला कुलूप लावायची वेळ येईल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे.
महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी अलिबाग येथील जोगळेकर नाका येथे मंगळवारी (दि. 30) महायुती आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.
या बैठकीला आमदार महेंद्र दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस ए.के. शर्मा, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी, ज्येष्ठ नेते विजय कवळे, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. महेश मोहिते, सहकार सेलचे गिरीष तुळपुळे, उपाध्यक्ष अ‍ॅड. पल्लवी तुळपुळे, शहर अध्यक्ष अ‍ॅड. अंकित बंगेरा, राष्ट्रवादी काँग्रेस विधी विभाग कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास नाईक, शिवसेनेचे अ‍ॅड. सुशील पाटील आदी उपस्थित होते.
अनंत गीते आठ वेळा लोकसभा निवडणूक लढले. प्रत्येकवेळी भाजप त्यांच्यासोबत होता. भाजपमुळेच दोन वेळा त्यांना मंत्रीपदही मिळाले, मात्र आज तेच अनंत गीते भाजपवर टीका करीत आहेत. भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी टीका करताना गीतेंनी भान राखले पाहिजे, असे खासदार तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत 2017मध्येच युती करण्याचा निर्णय घेतला होता. जागावाटप, मंत्रीपद याबाबतही ठरले होते. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या समवेत आमची बैठक झाली. तुम्ही आमच्यासोबत या, पण आम्ही शिवसेनेला सोडणार नाही, अशी अट त्यांनी ठेवली. त्यामुळे निर्णय होता होता राहिला, असा गौप्यस्फोट खासदार सुनील तटकरे यांनी या वेळी केला.
2019मध्ये शिवसेना-भाजप एकत्र लढले. नंतर मात्र शिवसेनेने आमच्यासोबत सत्ता स्थापन केली. हा निर्णय न पटल्याने शिवसेनेच्या आमदारांनी वेगळा गट स्थापन करून ते भाजपसोबत आले. आम्हीदेखील व्यापक राष्ट्रहीत आणि विकासाच्या मुद्द्यावर महायुतीत सहभागी झालो. राजकारणात अपरिहार्यता असतात. त्यामुळे वेळोवेळी व्यापक हितासाठी असे निर्णय घ्यावे लागत असल्याचे खासदार तटकरे म्हणाले.
या वेळी गिरीष तुळपुळे, अ‍ॅड. पल्लवी तुळपुळे, अ‍ॅड अंकित बंगेरा, अ‍ॅड. सुशील पाटील, अ‍ॅड. विलास नाईक यांचीदेखील समयोचित भाषणे झाली.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply