Breaking News

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो,
कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता है, पैसे का नहीं,
मै एक कलाकार हूं, मक्कार नही,
हमारी जिंदगी का तंबू तीन बम्बुओं पर खडा हुआ है, शायरी शबाब और आप,
तोहफा देने वाली की नियत देखी जाती है, तोहफे की किमत नही,
जिसने पी नही व्हीस्की, किस्मत फूट गयी उसकी,
…प्रकाश मेहराच्या दिग्दर्शनातील शराबी (मुंबई रिलीज 18 मे 1984) हे अमिताभ बच्चनने आपल्या शैलीत साकारलेले हे संवाद पडद्यावर आले रे आले की थेटरातील टाळ्या, शिट्ट्या हमखास उमटणारच. या सुपर हिट पिक्चरच्या मुंबईतील प्रदर्शनास चाळीस वर्ष झालीदेखील तरी आज यू ट्यूबवर शराबी एन्जॉय करताना तीच रंगत.
चित्रपटाच्या पडद्यावरील शराबी (दारूड्या शब्द अगदीच सुमार वाटतो) म्हटलं तरी अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित ’दाग’, बिमल रॉय दिग्दर्शित ’देवदास’ यापासून अनेक पिक्चर आहेत आणि अनेक गाण्यातही ’शराबी’पण आहेच. यह जो मोहब्बत है (कटी पतंग), जाम मे डूब रही यारों मेरी जीवन की हर शाम (नमक हराम) वगैरे अनेक. फिल्मी पार्टीतील ’दारूकाम’ म्हटलं तरी राज कपूरच्या पार्ट्यांचे अनेक किस्से, कथा, दंतकथा कायमच चघळून सांगितल्या जातात.
पिक्चरचं नावच शराबी हे एकदम थेटच सांगते की ही गोष्ट दारूचं भारीच व्यसन लागलेल्या माणसाची आहे. ही सुचली कशी यामागेही एक गोष्ट आहे. मनमोहन देसाई दिग्दर्शित ’कुली’च्या बंगळुरू येथील मारहाणीच्या दृश्यात पुनीत इस्सारचा ठोसा चुकवण्याच्या प्रयत्नात टेबलाचा कोपरा पोटात लागल्याने जखमी आणि मग आजारी झालेल्या अमिताभने 1983च्या जानेवारीपासून पुन्हा शूटिंगला सुरुवात केली. काही महिन्यांतच चित्रपटसृष्टीतील काही स्टार, निर्माते, दिग्दर्शक, गायक, संगीतकार असा समूह विदेशात स्टेज शोसाठी (मेगा इव्हेंट) गेला. त्यात न्यूयॉर्क ते त्रिनिदाद टोबॅगो अशा विमान प्रवासात प्रकाश मेहरा अमिताभच्या शेजारी येऊन बसला आणि गप्पांच्या ओघात म्हणाला, आपण एक पिता व पुत्र यांच्या नात्यावर एक चित्रपट बनवूया. आपल्या बिझनेसमध्ये कमालीचा बिझी असलेल्या उद्योगपतीचा मुलगा आपल्या श्रीमंत घरातील मुन्शीच्या सहवासात राहून मोठा होतो, पण घरातच प्रेम मिळत नाही. म्हणून कमालीचा दारूच्या आहारी जातो. या नात्यातील तणाव, संघर्ष यांची गोष्ट. चित्रपटाचे नाव शराबी.
अटलांटा महासागरातून पस्तीस हजार फूटांवरून विमान जात असताना ठरलं, ‘शराबी’ची निर्मिती करायची. ही गोष्ट खुद्द अमिताभनेच एका मुलाखतीत रंगवून खुलवून सांगितलीय.
प्रकाश मेहरा सिनेमात पुरता मुरलेला माणूस. माझ्या आवडत्या दिग्दर्शकांतील एक. गीतकार बनायला तो चित्रपटसृष्टीत आला, मग दिग्दर्शक झाला, अन्य निर्मात्यांचे चित्रपट दिग्दर्शित करीत असतानाच स्वत: जंजीर (1973)पासून निर्माताही झाला. ’समाधी’च्या दिग्दर्शनात मग्न असतानाच धर्मेंद्रच्या तारखांचा काही मेळ लागेना. त्यात त्याची दुहेरी भूमिका. आशा पारेख व जया भादुरी या दोन नायिका. अशातच एक अल्पावधीत एक चित्रपट बनवू असा विचार करीत ’जंजीर’ बनवायचे ठरले. जयानेच प्रकाश मेहरांना अमिताभचे नाव सुचवले आणि पटकथाकार सलीम जावेद जोडीतील जावेद अख्तर यांनी एस. रामनाथन दिग्दर्शित ’बॉम्बे टू गोवा’ (1972) पाहून अमिताभचे नाव निश्चित करण्याचा सल्ला दिला. पुढचा इतिहास सर्वज्ञात आहे.
अमिताभच्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांत मनमोहन देसाई व प्रकाश मेहरा माझे जास्त आवडते. मेहरांनी तर अमिताभला विविध रूपात पडद्यावर आणले. ’जंजीर’नंतर ’हेरा फेरी’ (1976), ’मुकद्दर का सिकंदर’ (1978), ’लावारीस’ (1981), ’नमक हलाल’ (1982), ’शराबी’ (1984), ’जादुगर’ (1989) हे या जोडीचे चित्रपट. ’खून पसिना’ (1977)चे निर्माते प्रकाश मेहराच होते. त्यांनी आपला सहाय्यक दिग्दर्शक राकेशकुमारला स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनाची संधी दिली. या जोडीचे यशाचे प्रगती पुस्तक भारी गुणांचे आहे. फक्त ’जादुगर’ दाणकन आपटला आणि ही जोडी कायमची फुटली. त्याची सुरुवात ’शराबी’ पूर्ण होत असतानाच सुरू झाली…
आजारपणातून बरे झाल्यावर अमिताभचे लक्ष आता सेटवर गेलेल्या प्रकाश मेहरा दिग्दर्शित ’शराबी’ आणि टी. रामाराव दिग्दर्शित ’इन्कलाब’ या चित्रपटांवर होते. वक्तशीर, मेहनती, व्यावसायिक व कामाची योग्य नियोजन करणार्‍या अमिताभने सगळी आखणी करेपर्यंत ’शराबी’ची पटकथा लक्ष्मीकांत शर्मा यांनी लिहिली. कादर खानने संवाद लिहिले. निर्माते सत्येन पाल चौधरी यांनी भरभर सगळी आखणी केली. प्रकाश मेहरा अन्य कलाकारांच्या निवडीत गुंतले. राकेश रोशन निर्मित व के. विश्वनाथ दिग्दर्शित ’कामचोर’ (1982)च्या यशानंतर जयाप्रदाला मोठ्याच प्रमाणावर हिंदीत ऑफर होती. तिने ’शराबी’ साईन तर केला, पण तारखांची समस्या निर्माण झाल्याने राकेश रोशन निर्मित व के. विश्वनाथ दिग्दर्शित ’जाग उठा इन्सान’ सोडावा लागला. तो श्रीदेवीला मिळाला. ही साईड स्टोरी.
’शराबी’ विक्की कपूर अमिताभ हे निश्चित होतेच. जयाप्रदाही ठरली. विक्कीच्या पित्याच्या अमर नाथ यांच्या भूमिकेत प्राण तसेच ओम प्रकाश (मुन्शी फुलचंद), रणजित, भारत भूषण (मास्टरजी) यासह चंद्रशेखर, आशालता, जानकीदास, सत्येन कप्पू, दीपक पराशर, ए.के. हनगल आणि विशिष्ट पद्धतीच्या मिशीत मुकरी.
तब्बल दोन तास छप्पन मिनिटे या अवधीच्या शराबीत बिझी उद्योगपती पिता आणि त्यामुळेच दारूच्या आहारी गेलेला पुत्र. (शराब की बोतल पर अगर मै लेबल की तरह चिपक गया हू तो उस लेबल को चिपकानेवाले आप है, हा संवाद बरेच काही सांगतो. यह इंसान नही है, यह तो मशीन है ऐसी मशीन जो सिर्फ नोट छापती है और नोट खाती है अशी या पुत्राची खंत) पिता बिझी म्हणून घरातील मुख्य नोकर या मुलाला सांभाळतो. त्याला नायिकेकडून प्रेम मिळते. (जिनका अपना दिल तुटा होता है, वो दुसरों का दिल नही तोडा करते) पटकथेत अनेक गोष्टी घडत घडत रंगत वाढते आणि त्यात मनोरंजनाची भट्टी आणि पट्टी जमते ती गीत संगीत व नृत्याने. संगीत बप्पी लाहिरीचे आहे. प्रकाश मेहरा यांनी जहा चार यार मिले (पार्श्वगायक किशोरकुमार व अमिताभ), इंतेहा हो गयी (आशा भोसले व किशोरकुमार) ही गाणी लिहिली. अंजान यांनी मुझे नौलखा मंगवा दे (आशा भोसले व किशोरकुमार), दे दे प्यार दे प्यार दे (आशा भोसले व किशोरकुमार), मंझिले अपनी जगह है (किशोरकुमार), लोग कहते है (आशा भोसले व किशोरकुमार) ही गाणी लिहिली. ही गाणी लांबलचक असूनही कंटाळा येत नाही. जहा चार यार गाण्यात एका कडव्यात महाराष्ट्रीय रूपात स्मिता पाटील आहे. (नमक हलालसाठी शूटिंग केलेला हा भाग यात वापरला. हेतू एकच, चित्रपट रसिकांचे मनोरंजन मनोरंजन मनोरंजन). इंतेहा हो गई हे गाणे अमेरिकेत गाणे द रनर यावर बेतलयं. या चित्रपटाचे संवादही लांबलचक होते. ते कायम ठेवले तर पिक्चर पाच तासांचा होईल अशी अमिताभने व्यक्त केलेली भीती मेहरा यांनी स्वीकारली.
सगळं कसं आकार घेत होते असे तुम्हाला वाटेल. तसे अनेकदा नसतेच. अशातच दिवाळी आली. आणि आपल्या प्रतिक्षा बंगल्यावर फटाके फोडत असतानाच अमिताभच्या डाव्या हाताला जखम झाली. आता शूटिंग रखडणार हे उघड होते, पण अमिताभ थांबायला तयार नव्हता. त्याने एक मार्ग काढला. डावा हात शर्ट अथवा कोटाच्या खिशात ठेवून शूटिंग सुरू केले. तो ’शराबी’ असल्याने तो असे करू शकतो हे त्यामागचे लॉजिक. पण चक्क ते फळले. ती जणू स्टाईल वाटली.
त्या काळात मनमोहन देसाई व प्रकाश मेहरा यांच्यात भारीच तू तू मै मै चालायचं. मनजी मेहराना खिजवत म्हणाले, एक शराबी ही शराबी फिल्म ही बना सकता है, असली मर्द ही मर्द फिल्म बना सकता है…. प्रकाश मेहरा काही कमी नव्हते. त्यांनीही तेवढेच टोकदार उत्तर दिले, एक कुली ही कुली फिल्म बना सकता है, इतनी उंची बाते कर सकता है… हा शाब्दिक हल्ला प्रतिहल्ला त्या काळात खूपच गाजला. मनमोहन देसाई व प्रकाश मेहरा यांच्यातील वाद सर्वश्रुत. या दोघांच्याही चित्रपटात दोन जण कॉमन असत. अमिताभ व कादर खान. (कालांतराने अमिताभने कादर खानला दूर केले ती गोष्ट वेगळीच). अमिताभने ’इंडिया टुडे’च्या मुखपृष्ठासाठी आपण, मनमोहन देसाई व प्रकाश मेहरा असा अतिशय दुर्मीळ योग जुळवून आणला. फार गाजलं हो ते फोटो सेशन.
’शराबी’ रिलीजसाठी तयार होता होता चित्रपटाचे पार्श्वसंगीत वगैरेवरून अमिताभ व प्रकाश मेहरांमध्ये तू तू मै मै सुरु झाली. चित्रपट रिलीज होऊन सुपरहिटही झाला. मेहरांना वाटलं, बस्स झाला अमिताभ. त्यांनी शत्रुघ्न सिन्हाला घेऊन ’ज्वालामुखी’ तर राजकुमारला घेऊन ’मोहब्बत के दुश्मन’ व ’मुकद्दर का फैसला’ बनवले. फ्लॉपची हॅट्ट्रिक झाली हो. मेहरा परत अमिताभकडे आले. आता अमिताभचा सल्ला महत्त्वाचा होता. ’जादुगर ’चा उत्तरार्ध त्याने बराच बदलून घेतला यावर गॉसिप्स मॅगझिनमधून बरेच उलटसुलट आले. पिक्चर मात्र फ्लॉप झाले नि ही जोडी कायमची फुटली.
अमिताभच्या साठीच्या निमित्ताने मुंबईतील एका मराठी वृत्तपत्राच्या रविवार पुरवणीसाठी प्रकाश मेहरा यांच्या मुलाखतीचा योग आला असता, ’जंजीर’साठी अमिताभला कसा निवडला हे अतिशय मनापासून सांगितले.
(ते याच लेखात वर दिलेय) आताही आपल्याकडे अमिताभसाठी एक चांगली पटकथा आहे. भेटीसाठी कधी वेळ देतोय याची वाट पाहतोय, मेहरांच्या बोलण्यात आत्मविश्वास कमी, पण उसने अवसान जास्त होते… अर्थात हा योग जुळून आलाच नाही. या जोडीने भरपूर मनोरंजन दिले. ’शराबी’ त्यातील धमाकेदार.

-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply