खोपोली: प्रतिनिधी
पुणे येथून ठाणे कडे एक्सप्रेस वे मार्गाने निघालेल्या एसटी महामंडळाच्या प्रवाशी बसचा खोपोली हद्दीत गुरुवारी (दि.०६) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. या बस मध्ये एकूण 30 प्रवाशी प्रवास करत असून पाच प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील दोघे जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. पाचही जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही बस खोपोली हद्दीतुन एक्सप्रेस वे ने ठाणे कडे जात असताना आडोशी उतारावर बस अनियंत्रित होऊन बसने पुढील कंटेनरला जोरदार धडक दिली. यात बस मधील 30 पैकी पाच प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन पुरुष, एक महिला आणि एक लहान मुलाचा समावेश आहे. विनिद गोरे (वय 56), रामचंद्र बाबर (वय 54), सुजाता खडतरे (वय 58), प्रीतम पाटील (वय 28) व एक मुलगा (नाव समजले नाही) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. यातील दोघे पनवेल व तीन जण ठाणे परिसरातील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच एक्सप्रेस वे वरील सर्व आपत्कालीन यंत्रणा, वाहतूक पोलीस, खोपोलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने मदतकार्य करून, जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी दाखल करण्याची कामगिरी बजावली. त्यानंतर अपघात ग्रस्त बस एका बाजूला आणून एक्सप्रेस वे वरील वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.