Breaking News

शेतीसाठी बियाणे मिळत नसल्याने शेतकरी हतबल

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यात दरवर्षी डिसेंबर महिन्यात राजनाला कालव्याला दुबार भातशेतीसाठी पाणी सोडण्यात येते. यंदाही पाणी सोडण्यात आले आहे, मात्र भातशेती लावण्यासाठी जे चांगले बियाणे आवश्यक असते ते बियाणेच कृषी कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र यांच्याकडे उपलब्ध नसल्याने आता भातशेती करायची तरी कशी असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर खरीप पीक तथा भातशेती केली जाते. तेव्हा कृषी कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, भात खरेदी विक्री संघाकडून शेतकर्‍यांना चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध करून दिले जाते. जुलै ते नोव्हेंबर या महिन्यात भात तयार होते. त्यांनतर पुन्हा याच शेतीत राजनाला कालव्याच्या पाण्यावर दुबार भातशेती करण्यात येते. मात्र त्यासाठी जे बियाणे लागते ते आता उपलब्ध होत नसल्याने शेतकर्‍यांसमोर संकट उभे राहिले आहे. कर्जत – 3, 5, 7 ,184 तसेच सह्याद्री – 3 हि बियाणे चांगल्या दर्जाची असून कमी दिवसात अधिक उत्पन्न देणारी बियाणे आहेत. मात्र आता ती कोठेही उपलब्ध नाहीत. याबाबत तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी बियाणे शिल्लक नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, भात खरेदी विक्री संघ यांच्याशी संपर्क करावा असे शेतकर्‍यांना सांगितले . शेतकर्‍यांनी त्यानुसार सुचविलेल्या ठिकाणी बियाणांबाबत विचारणा केली तेथूनही बियाणे नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. आता त्वरित बियाणे मिळाल्यास भात लागवड केली तर एप्रिलपर्यत भात तयार होईल अशी माहिती तानाजी चव्हाण यांनी दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply