Breaking News

पनवेल मनपा करणार दिव्यांग लाभार्थींना व्यवसाय आणि उच्च शिक्षणासाठी मदत

उपायुक्त लेंगरेकरांवर कारवाईची नगरसेवकांकडून मागणी

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना सन 2019-20 या आर्थिक वर्षातील निधी वाटप करण्यासाठी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 20) झालेल्या महासभेत केले. दिव्यांगांना महापालिकेच्या वतीने उच्च शिक्षणाचा खर्च किंवा व्यवसाय करण्यासाठी लागणारी सामग्री घेण्यासाठी हा निधी दिला जाणार आहे. दरम्यान, या सभेत उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याविषयीही चर्चा होऊन त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली.
पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाली. या वेळी महापालिका हद्दीतील दिव्यांग लाभार्थींना त्यांच्या अपंगत्वाच्या टक्केवारीवर कशा प्रकारे मदत केली जाते याबाबतची माहिती आयुक्तांनी दिली.
या वेळी त्यांनी महापालिका दारिद्य्र निर्मूलनाच्या निधीपैकी पाच टक्के निधी दिव्यांगांवर खर्च करू शकते असे सांगून या वर्षी 50 टक्के निधी त्यांना वाटण्यात आला असून, 50 टक्के निधी नगरसेवकांनी सुचविल्यावर दिला जाणार आहे, असे सांगितले.
नगरसेवक आणि अधिकार्‍यांनी एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे असे सांगून उपशिक्षिका ज्योत्स्ना घरडाप्रकरणी शासकीय डीएड विद्यालयाच्या प्राचार्य ज्या शिक्षण उपसंचालक ग्रेडच्या असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली विशाखा समिती नेमण्यात आली, पण घरडा या त्यांनी मागितलेला वेळ देऊन, नोटीस बजावूनही समितीसमोर चौकशीला येत नसल्याचे आयुक्तांनी सभागृहाला सांगितले. उपलब्ध माहितीवरून समितीने आपला अहवाला तयार केला आहे. तो सभागृहाच्या समितीला दाखवून त्यांनी काय कारवाई करावी याबाबत निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.  
शासनाच्या 2016च्या आदेशाप्रमाणे प्रत्येक कर्मचार्‍याची वर्षाला 354 रुपये रक्कम भरण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेतील अपघाती निधन झालेल्या कर्मचार्‍यांच्या कुटूंबांच्या वारसांना विमा कंपनीकडून मिळालेला 10 लाख रुपयांचा धनादेश महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते देण्यात आला. त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळविणार्‍या कर्मचार्‍यांच्या मुलांचा, तसेच महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे यांचाही सत्कार करण्यात आला.

सर्वांना समान न्याय द्या : नगरसेवक नितीन पाटील
या वेळी पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्यासोबत झालेल्या घटनेबद्दल भाजप नगरसेवक नितीन पाटील यांनी सभागृहाला सांगितले की, आपण त्यांना भेटायला गेलो तेव्हा एकटे नव्हतो, तर आपल्यासोबत सहा नगरसेवक होते. आम्ही त्यांना कारवाई करताना भेदभाव का करता, असा प्रश्न विचारून सगळ्यांना समान न्याय देण्याची मागणी केली. त्यांना कोणतीही शिवीगाळ केली नाही. त्यावर अनेक नगरसेवकांनी लेंगरेकर यांच्या लोकप्रतिनिधींशी बोलण्याच्या पद्धतीविषयी तक्रार केली. शेकापच्या नगरसेविका डॉ. सुरेखा मोहकर यांनी आपल्याला त्यांच्या केबिनमध्येही जाण्यास भीती वाटते, असे सांगितले. उपशिक्षिका ज्योत्स्ना घरडा यांच्या तक्रारीच्या चौकशीचे काय झाले, असेही अनेक नगरसेवकांनी या वेळी विचारले.

उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची नगरसेवकांशी बोलताना भाषा योग्य नसते. लोकप्रतिनिधींशी कसे बोलावे याबाबत त्यांना समज देण्यात यावी. अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी कारवाईत सातत्य ठेवायला हवे. एका ठिकाणी कारवाई करावयाची आणि दुसरीकडे नाही हे बरोबर नाही. उपशिक्षिका ज्योत्स्ना घरडाप्रकरणी चौकशी पूर्ण करून त्यात दोषी ठरल्यास योग्य ती कारवाई करावी.
-परेश ठाकूर, सभागृह नेते,पनवेल महानगरपालिका

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply