पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेतील धानसर, कोयनावेळे, करवले आणि रोडपाली या चार गावांचे 46 कोटी रुपये खर्च करून स्मार्ट ग्राममध्ये रूपांतर केले जाणार आहे. याबाबतच्या ठरावाला बुधवारी (दि. 20) महापालिकेच्या महासभेत मान्यता देण्यात आली. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेप्रमाणे या गावांचा विकास केला जाणार असून, ही गावे राज्यात आदर्श मॉडेल ठरतील, असा विश्वास या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी व्यक्त केला.
पनवेल महापालिकेची महासभा आद्यक्रांतिवीर वसुदेव बळवंत फडके महाविद्यालयात झाली. प्रारंभी पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर आयकर विभागाचे सहआयुक्त संजय देशमुख आणि नितीन पाटील यांनी सभागृहात येऊन सदस्यांना ‘पनवेल बदल रहा है. इसके लिए आप टॅक्स भरो’ असे सांगून आयकरासंबंधी माहिती दिली व आयकर भरून आपले कर्तव्य बजावा, असे आवाहन केले.
यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात नगरसेवक नीलेश बावीस्कर यांनी पनवेल महापालिका हद्दीत नसलेल्या गव्हाण गावातील एका व्यक्तीला शौचालयासाठी पैसे दिल्याची माहिती आपण विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली असून, आपण त्या व्यक्तीला फोन लावून विचारले असता, त्याने पैसे मिळाल्याचे मान्य केल्याची माहिती सभागृहात दिली. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी चुकीचे वाटप केलेल्या अधिकार्यावर कारवाईची मागणी केली. आयुक्त गणेश देशमुख यांनी चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सभागृहाला सांगितले. राष्ट्रीय नागरी उपजीविका उपक्रमामध्ये कोणत्या योजना येतात आणि त्यांची माहिती देण्याबाबत नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली होती. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशाने विनया म्हात्रे यांनी सभागृहाला माहिती दिली. महिला व बालकल्याण सभापती लीना गरड यांच्यासह अनेक सदस्यांनी आजपर्यंत आम्हाला विश्वासात न घेता या योजना आमच्या प्रभागात राबविल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
पनवेल मनपा हद्दीतील धानसर, कोयनावेळे, करवले आणि रोडपाली या गावांचा स्मार्ट गावे म्हणून विकास करण्याच्या ठरावाला मान्यता देण्यात आली. असा ठराव आणल्याबद्दल आयुक्तांचे अभिनंदनही करण्यात आले. वाहनतळावर वाहन उभे करण्याच्या दराला मंजुरी देताना 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस कोणी वाहन उभे करून गेले असल्यास ते वाहन बेवारस ठरवण्याची मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली. त्यास मान्यता देण्यात आली.
ग्रामीण भागातही विविध सुविधा मिळणार
पनवेल महापालिकेने प्रथमच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेप्रमाणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 29 गावांचा विकास करण्यासाठी त्यातील धानसर, कोयनावेळे, करवले आणि रोडपाली ही गावे स्मार्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नगरसेवक अमर पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. स्मार्ट गाव विकासांतर्गत धानसरसाठी 10 कोटी 65 लाख 18 हजार रुपये, कोयनावेळेसाठी 15 कोटी 22 लाख रुपये, करवलेसाठी 12 कोटी रुपये आणि रोडपालीसाठी 12 कोटी 73 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या चार गावांमध्ये पुढील 10 वर्षांतील लोकसंख्या गृहीत धरून सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामध्ये मुख्यतः पाणीपुरवठा, गटार, इलेक्ट्रिक लाईन, सार्वजनिक शौचालय आणि रस्ते यांचा समावेश असणार आहे. रोडपालीचा स्मार्ट गावामध्ये समावेश करण्याचे कारण हे गाव सिडकोने विकसित केलेल्या वसाहतीजवळ असूनही त्याचा विकास झालेला नाही; तर कोयनावेळे हे प्रकल्पग्रस्तांचे गाव असल्याने त्याची निवड केली असल्याचे नगरसेवक अमर पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस नगरसेवक राजेंद्र शर्मा, नगरसेविका प्रमिला पाटील हेही उपस्थित होते.