पोलादपूर : प्रतिनिधी
पोलादपूर तालुक्यातील फणसकोंड जंगलात शिकारीसाठी गेलेले 12 शिकारी पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून, या कारवाईत शिकारींकडून दोन बंदुका, पाच काडतुसे, कोयते व बेचक्या हस्तगत करण्यात येऊन सर्वांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलादपूर पोलिसांकडून भरदुपारी करण्यात आलेल्या या कारवाईची वनविभागाला मात्र खबर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोंढवी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील फणसकोंड या महसुली गावाच्या जंगल भागात मंगळवारी (दि. 19) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास तब्बल 12 आदिवासी तरुण नदीच्या पाण्यावर पाणी पिण्यासाठी येणार्या जंगली श्वापदांची शिकार करण्याच्या हेतूने वावरत असल्याची माहिती पोलादपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुप्तवार्ता पोलीस कर्मचारी इक्बाल चाँदखा शेख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली. सर्व जण स्थानिक आहेत.
आरोपींमध्ये सायबू शिवराम पवार (45, बाजीरे-कापडे बुद्रुक), मारुती तुकाराम पवार (52), सुरेश लक्ष्मण मुकणे (32), काशिनाथ तुकाराम पवार (55), संतोष मोतीराम पवार (25, सर्व गाडीतळ-पोलादपूर) वामन सीताराम पवार (35), दिलीप चिल्या पवार (22), नीलेश यशवंत जाधव (21), रमेश काळुराम पवार (21), नितीन काळुराम पवार (24), भोलेनाथ बळीराम पवार (25), संजय काळुराम निकम (25, सर्व भोगाव खुर्द) या 12 जणांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि 08-2019 भारतीय हत्यार कायदा 1959चे कलम 3(1), 4, 25, 35 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलादपूर पोलिसांनी दिली.