मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) सीमा वाढविण्यास बुधवारी (दि. 20) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे वसई, पनवेल, अलिबाग, खालापूर व पेण तालुक्याचा उर्वरित भाग आणि पालघर तालुका पूर्णपणे या प्राधिकरणात समाविष्ट होणार आहे. या संदर्भातील एमएमआरडीए अधिनियमातील अनुसूचीमध्ये सुधारणा करण्यासाठीचा मसुदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यास मान्यता देण्यात आली असून, या निर्णयामुळे एमएमआरडीए क्षेत्रात दोन हजार चौ.किमीने वाढ होणार आहे.
बृहन्मुंबई व सभोवतालच्या प्रदेशात झपाट्याने होणारी लोकसंख्येची वाढ व त्या अनुषंगाने विकसनशील क्षेत्राचा सुयोग्य नियोजन व नियोजित विकास व्हावा यासाठी एमएमआरडीएची स्थापना करण्यात आली. 1967मध्ये अधिसूचित झालेल्या मुंबई महानगर प्रदेशचे भौगोलिक क्षेत्र 3965 चौ.किमी होते. त्यानंतर त्याची हद्द वाढवून ते 4355 चौ.किमी करण्यात आले. यात प्रामुख्याने पेण व अलिबाग तालुक्याचा काही भाग समाविष्ट करण्यात आला होता. मुंबई महानगर प्रदेशामध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांमुळे ही हद्द वाढविण्याची मागणी होती. या प्रकल्पांमध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई-सुरत शीघ्रगती महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, पालघर जिल्हा व उद्योग केंद्र, मुंबई पारबंदर प्रकल्प, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर, विविध मेट्रो प्रकल्प आदींचा समावेश आहे. या निर्णयामुळे एमएमआरडीएच्या एकूण क्षेत्रात दोन हजार चौ.किमी इतकी वाढ होणार आहे.
शहीद जवानांना मंत्रिमंडळाकडून श्रद्धांजली
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी हल्ल्यामागील सूत्रधार असणार्या पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. शहीद जवानांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश असून, या जवानांच्या कुटुंबीयांना शासनाने 50 लाखांची मदत दिली आहे, तसेच जवानांच्या कुटुंबीयांना जमीन देण्यासह एका सदस्यास शासकीय सेवेत सामावून घेण्यात येणार आहे.