
पनवेल ः प्रतिनधी
नवीन पनवेलमधील श्री हनुमान मंदिरात स्वरानंदच्या कलाकारांनी सादर केलेल्या सुमधूर संगीताने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला रसिकांना मंत्रमुग्ध केले. नवीन वर्षाची सुरुवात रंगतदार केल्याबद्दल रसिक प्रेक्षकांनी स्वरानंदच्या संचालिका अनुपमा वाघ यांना धन्यवाद दिले.
नवीन पनवेलमधील अनुपमा वाघ यांच्या स्वरानंद सुगम संगीत गायन क्लासतर्फे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी 5 वाजता नवीन पनवेलमधील पोदी येथील श्री हनुमान मंदिरात क्लासच्या ज्युनिअर आणि सीनियर विद्यार्थिनींचा सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 26 विद्यार्थिनींनी भाग घेतला. त्यांना तबल्यावर धनंजय कुटले आणि पेटीची साथ प्रतिभा कुळकर्णी यांनी दिली.
वंदना लंगोटे यांचे ’सत्यम शिवम सुंदरा’, कल्पिता पिंपटकर यांच्या ’सखी मंद झाल्या तारका’, चित्रा धोत्रे यांची ’तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ ही लावणी, तसेच ‘धीरे धीरे मचल ए दिले बेकरार’ या अंबिका कदम यांच्या गाण्यांनी रसिकांची वाहवा मिळवली
या वेळी प्रीती आठवले यांनी स्वरानंदमुळे आम्हाला प्लॅटफॉर्म मिळाल्याचे सांगून आम्ही सगळ्या सोमवार कधी येतो याची वाट पाहत असल्याचे सांगितले. या वेळी संचालिका अनुपमा वाघ यांनी अनू आजींची कमतरता जाणवत असल्याचे सांगून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अशी पाखरे येती अन् स्मृति ठेवूनी जाती हे गाणे सादर केले. या कार्यक्रमात सुलभा मोरे, लिना किस्मतराव, प्रिया सबनीस, सुचेता सारवे, संजीवनी कोचुरे, कल्पना जव्हारकर यांनी गाणी सादर केली.