Breaking News

‘अबोध’ची 40 वर्षे; म्हणे, माधुरीच्या कारकिर्दीला चाळीस वर्ष झाली…खरं वाटत नाही हो !!!

शबाना आझमी, स्मिता पाटील, दीप्ती नवल यांनी ऐंशीच्या दशकाच्या पूर्वार्धात समांतर (अथवा नवप्रवाहातील) चित्रपट व पारंपरिक लोकप्रिय मनोरंजक चित्रपट या दोन्हीत चांगलाच समतोल राखला होता.
सरगमच्या यशाने जयाप्रदा व हिम्मतवालाच्या यशाने श्रीदेवीची हिंदीतील वाटचाल सुकर झाली होती. डिंपल खन्नाने सागर स्वीकारत पुनरागमन करताच तिला जख्मी शेर, अर्जुन इत्यादी चित्रपट मिळाले होते. या दिवसात हे चित्रपट निर्मितीवस्थेत होते. पद्ममिनी कोल्हापूरे, पूनम धिल्लॉन, रति अग्निहोत्री, टीना मुनिम, मीनाक्षी शेषाद्री, अनिता राज यांची आपापल्या पध्दतीने वाटचाल सुरू होती. रेखा टिच्चून टिकून होतीच.
अशातच एके दिवशी राजश्री प्रॉडक्सन्सच्या प्रथेनुसार एक आमंत्रण हाती आले, हीरेन नाग दिग्दर्शित अबोध प्रदर्शनास सज्ज झाला असून मरीन ड्राईव्ह येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दुपारी चार वाजता या चित्रपटातील नवीन कलाकार माधुरी दीक्षित व तापस पॉल आणि या चित्रपटाच्या युनिटची सिनेपत्रकारांशी भेट घडवण्यात येणार आहे.
माधुरी दीक्षित हे नाव मी त्यावेळेस पहिल्यांदाच वाचले आणि आणखीन एक नवतारका चित्रपटसृष्टीत पाऊल टाकतेय असे वाटले. मीही मिडियात तसा नवीनच होतो आणि अशा वेळेस फारसा उशीर करू नये अशा समजूतीत होतो. चित्रपटसृष्टीत वावरताना वाढताना त्यात बदल होत होत गेला तो भाग वेगळा. राजश्री प्रॉडक्सन्सचा चित्रपट ही गोष्ट मला नवीन नव्हती. ऑपेरा हाऊस थिएटरला कुटुंबासह पाहिलेला उपहार (1972) हा राजश्री प्रॉडक्सन्सचा मी पाहिलेला पहिला चित्रपट. त्यानंतर सौदागर, गीत गाता चल, दुल्हन वही जो पिया मन भाये, अखियोंके झरोखो से असे राजश्री प्रॉडक्सन्सचे चित्रपट पाहत पाहत मोठा झालो. त्यांच्या चित्रपटांची हिंदीतील भली मोठी तपशीलवार श्रेयनामावली, सहकुटुंब पहावेत असे स्वच्छ मनोरंजक चित्रपट, आदर्श कथानक अशा गोष्टींचा मनावर असलेला पगडा कायम ठेवतच महेश भट्ट दिग्दर्शित सारांश (मुंबईत रिलीज 25 मे 1984) च्या अशाच पत्रकार परिषदेला गेलो आणि मी एकूणच नवखा असल्यानेच बुजल्यासारखा वागलो. (गिरगावातील चाळीत मध्यमवर्गीय संस्कारात वाढल्याने असेल कदाचित) आणि आता अबोधच्या दुपारी चार वाजताच्या पत्रकार परिषदेस वेळेवर पोहचलो होतो.
…पाच वाजले, साडेपाच वाजले तरी माधुरी दीक्षित पोहचली नाही. राजश्री प्रॉडक्सन्सचा लौकिक पाहता हे अनपेक्षित होते. उगाच आमची आपली कुजबुज सुरू झाली, पहिल्याच चित्रपटाच्या वेळेस ही उशीरा येतेय, स्वतःला काय स्टार समजते काय? वगैरे वगैरे. सिनेपत्रकारीतेत गॉसिप्स पहिल्या क्रमांकावर असते, चित्रपट कसा आहे वगैरे नंतर येते हा जणू धडाच मला मिळत होता…
अशातच माधुरी दीक्षित आली. अगदीच महाविद्यालयीन युवती हो. सोबत आई बाबा होते. त्या काळातील अनेक अभिनेत्री असा आईचा हात धरूनच चित्रपटसृष्टीत येत. माधुरीने आल्या आल्या सर्वांची माफी मागत म्हटलं ( संस्कार म्हणतात ते हेच), अंधेरीतील जे. बी. नगरवरून आम्ही वेळेवर निघालो, पण ट्रॅफिकमध्ये फार अडकलो… पहिलाच चित्रपट असला तरी माधुरीच्या वागण्यात/ बोलण्यात/ पाहण्यात/ ऐकण्यात कसलेही अवघडलेपण नव्हतेच. ती आम्हा जवळपास सर्वच सिनेपत्रकाराना छान हसत भेटली. (तेव्हापासूनचे तिचे ते हास्य आजही कायम आहे). मोबाईल येण्याच्या खूपच अगोदरचा हा काळ.
मला आठवतय, शुक्रवारच्या नवशक्तीतील सदरात या चित्रपटाची सर्वसाधारण ओळख मी करून दिली. माधुरी दीक्षितला मी दिलेले हे पहिले कव्हरेज. निमित्त अर्थात अबोध. काही दिवसातच अबोधच्या मुंबईतील प्रदर्शनाची तारीख ठरली, 10 ऑगस्ट 1984. (म्हणजेच चाळीस वर्ष झालीदेखिल हो). त्या काळात चित्रपटाच्या प्रिन्ट असत आणि टप्प्याटप्प्याने चित्रपट प्रदर्शित होत. शहरातून ग्रामीण भागात चित्रपट पोहचायला काही महिने (कधी एक दीड वर्ष) लागत. राजश्री प्रॉडक्सन्सचे देशभरात चित्रपट वितरणाचे जाळे होते…(चित्रपट संस्कृतीचा अभ्यास करताना ही गोष्टही महत्त्वाची..प्रेक्षकांपर्यंत चित्रपट कसा पोहचत आला हे खूपच माहितीपूर्ण व रंजक आहे.)
अबोधचा आम्हा चित्रपट समीक्षकांसाठीचा प्रेस शो रिलीजच्या दोन दिवस अगोदर न्यू एक्सलसियर थिएटरमधील चौथ्या मजल्यावरील मिनी थिएटरमध्ये होता. मला आजही आठवतेय, कोणतीही कसलीही अपेक्षा न ठेवता मी अबोध पाह्यला बसलो. राजश्री प्रॉडक्सन्सचा चित्रपट जसा सरळ रेषेत जाणारा, साधी गोष्ट असणारा हवा तसाच हाही चित्रपट होता. त्याची गोष्ट आता आठवत नाही. तशी ती नव्हतीच.
आपले स्वाभाविक हास्य, नृत्य साधना आणि शैली तसेच फॅन्स आणि फॉलोअर्सकडून सोशल मिडियात भरपूर लाईक्स मिळवत असलेल्या माधुरी दीक्षितची भूमिका असलेला पहिला हिंदी चित्रपट राजश्री प्रॉडक्सन्सच्या ’अबोध’च्या प्रदर्शनास यशस्वी 40 वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटाचे निर्माते ताराचंद बडजात्या होते, तर दिग्दर्शन हीरेन नाग यांचे होते. बंगालचा सुपर स्टार तापस पॉल या चित्रपटात माधुरी दीक्षितचा नायक होता. या चित्रपटात अशोक सराफ, शीला डेव्हिड, लीला मिश्रा, दिनेश हिंगू, सुरेन्द्र पुरोहित, सविता प्रभूणे, राजश्री नायर, मोहन चोटी इत्यादींच्याही भूमिका आहेत तर संगीत रवींद्र जैन यांचे आहे.
आज मी जुन्या आठवणीत रमतो, फ्लॅशबॅकमध्ये जातो तेव्हा अबोध चे ते दिवस व तेव्हाची माधुरी दीक्षित हे सगळेच डोळ्यासमोर येते.
आपलं दिलखुलास आकर्षक व्यक्तिमत्व आणि मेहनत या गुणांवर यशस्वी ठरलेली माधुरी दीक्षित हिंदी चित्रपटसृष्टीतील नंबर वनची तारका ठरली तरी मराठी भाषा, संस्कृती, सभ्यता, परंपरा, मूल्ये यांना विसरली नाही हे मी एक सिनेपत्रकार म्हणून अनुभलयं. हिंदी चित्रपटाच्या सेटवर त्या काळात ती मराठी सिनेपत्रकाराना आवर्जून मराठीतच मुलाखत देई. तिने मराठी चित्रपटातून भूमिका साकारावी अशी मराठी सांस्कृतिक, सामाजिक इच्छा होतीच. माधुरी दीक्षितने ’बकेट लिस्ट’ (2018) या मराठी चित्रपटात भूमिका साकारली. तसेच तिने ’15 ऑगस्ट’ (2019) या मराठी चित्रपटाची निर्मितीही केली. हा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्थात तिसरा पडदा पध्दतीने रिलीज रिलीज केला, पण माधुरी दीक्षितने या चित्रपटाचा मुंबईत ग्लॅमरस प्रीमियर शो केला. तिनेच पंचक (2024ला प्रदर्शित) या मराठी चित्रपटाचा निर्मित केली आणि प्लाझा चित्रपटगृहात तिने आपल्या या चित्रपटाच्याच खेळास थिएटर भेटही दिली. माधुरीला पाहताच हाऊसफुल्ल गर्दीच्या आनंदाला उधाण आले. अनेकांच्या आयुष्यातील हा स्मरणीय क्षण ठरला असेल. आपल्या कारकीर्दीच्या चाळीसाव्या वर्षीही अशी लोकप्रियता टिकवणे सोपे नसते हो. ते माधुरीला तिच्या गुणांनी साध्य झाले…
माधुरीच्या यशात अनेक गोष्टी…
तिचं कायमस्वरुपी हास्य. मधुबाला, माधुरी, सोनाली बेन्द्रे, ऐश्वर्य रॉय यांच मधुर हास्य डोळ्यासमोर आणलतं तरी आपण फ्रेश होतो. भरत रंगाचारी दिग्दर्शित टक्कर (1993)च्या सेटवर सोनालीशी माझी पहिली भेट झाली. त्यानंतर तिच्या मुलाखतीनिमित्त अनेक भेटी होत होत अलिकडेच सरफरोशच्या पंचवीस वर्ष पूर्णच्या इव्हेन्टसला भेटलो, तेच हास्य.
माधुरीची व्यावसायिकता…निर्माते सुधाकर बोकाडे यांची साजन (1991)च्या खणखणीत यशावर मुलाखत घेण्याचा योग आला असता त्यांनी मला सांगितले, त्यांनी निर्मिलेल्या इज्जतदार, साजन व प्रहार या चित्रपटात माधुरीने भूमिका साकारताना आऊटडोअर्स शूटिंगच्या वेळेस हॉटेलमधील आपल्या कपड्यांच्या लॉन्ड्रीचं बिल स्वतः भरले. तो खर्च कधीच ती निर्मात्याच्या खात्यात टाकत नाही…
माधुरीचे नृत्य…मिडियात असल्यानेच मला तिचं चित्रपटातील नृत्याच्या वेळेस सेटवर शूटिंग रिपोर्टींगचा चक्क तीनदा लाईव्ह अनुभव आला. दिग्दर्शक एन. चंद्रा
यांच्या आमंत्रणावरुन मेहबूब स्टुडिओत तेजाब चे एक दोन तीन चार गाणे, दिग्दर्शक पंकज पराशरच्या राजकुमारच्या फिल्मालय स्टुडिओतील सेटवर आणि डेव्हिड धवन दिग्दर्शित यारानाच्या हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओत…नृत्यासाठीची माधुरीची अथक मेहनत थक्क करून टाकणारी. अक्षरश: घाम गाळणे म्हणजे काय हे तेव्हा दिसले…
माधुरी दीक्षित या नावाभोवतीचं वलय आणि वळण अनेक गोष्टींतून आकाराला आलेय. त्याच्या गोष्टी सांगाव्यात तेवढ्या थोड्याच.
मी चित्रपट पत्रकार/ विश्लेषक म्हणून माधुरीची अबोध पासूनची वाटचाल पाहतोय. कधी तिची भूमिका असलेल्या चित्रपटांच्या मुहूर्तांना हजर राहिलो (तेजाब, त्रिदेव इत्यादी), तर कधी मुलाखतींचे योग. तर कधी तिची भूमिका असलेल्या चित्रपटांच्या सेटवर शूटिंग रिपोर्टींगचे योग.
पटतं नाही ना, माधुरी दीक्षितच्या कलरफुल, अष्टपैलू धक धक कारकिर्दीला चाळीस वर्ष पूर्ण झाली…..आकड्यात झाली
म्हणायचे इतकेच.

-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply