Breaking News

विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीकडून अपप्रचार होईल -मंत्री रवींद्र चव्हाण

नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सावध राहण्याचे आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त
महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह पसरवत जनतेची दिशाभूल केली आणि स्वतःचा फायदा करून घेतला. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीकडून अपप्रचार करण्याचा प्रयत्न होईल, अशी टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि.24) येथे केली तसेच जनतेने आणि कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या थापेबाजीला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी या वेळी आवर्जून केले.
भाजपची कोकण विभागीय बैठक मार्केट यार्ड येथे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यानंतर या संदर्भात मंत्री रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषद झाली. त्या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील उपस्थित होते.
बैठकीच्या संदर्भात बोलताना बूथ व मंडल स्तरावर उत्कृष्ट काम आणि संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी मार्गदर्शन केले असल्याचे नामदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, सर्वसामान्य माणसाचा विकास हाच ध्यास घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुती सरकार सक्षमपणे काम करत आहे. लाडकी बहीण योजना, वयोश्री, अन्नपूर्णा, गरीब कल्याण, स्कॉलरशिप, मुलींना मोफत उच्च शिक्षण, आनंदाची शिधा, नमो शेतकरी, पीएम किसान अशा अनेक योजना प्रत्यक्षात अमलात आणून त्याचा लाभ जनतेला होत आहे, मात्र विरोधक प्रत्येक वेळी या लोककल्याणकारी योजनेत खडा घालण्याचे काम करत आहेत. असे असले तरी या योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहचवण्याचे काम लोकहिताची जबाबदारी म्हणून कार्यकर्त्यांनी करावे.
पूर्वी काँग्रेस सरकार रोटी, कपडा, मकान आणि गरीबी हटाओ असा नारा द्यायची, पण त्यांना ते कधीही शक्य झाले नाही. मोदी सरकार गरीब कल्याण योजना राबवत 80 कोटी नागरिकांना अन्नधान्य देत आहे, पंतप्रधान आवास योजना राबवून लाखो कुटुंबाना घरकुल दिले आहे. या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले जात आहे. बारा बलुतेदारांचे प्रश्न सोडविण्याचे आणि प्रत्येक घटकापर्यंत योजना पोहचविण्याचे काम प्रामाणिकपणे केले जात आहे. महायुतीने सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत, तर महाविकास आघाडी खोटे बोला, पण रेटून बोला या पद्धतीने काम करत आहे, असा टोला मंत्री चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.
बदलापूर बालिका अत्याचारासंदर्भात पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना, बदलापूर व इतर प्रकरणासंदर्भातील नराधमांच्या कृत्यांचे कोणीही समर्थन करू शकत नाही. सर्व आरोपींना अटक झाली असून ही केस फास्टट्रॅकने होण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि त्या अनुषंगाने सरकार म्हणून भूमिका घेतली असल्याची माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply