पाली : धम्मशील सावंत
राज्यात सध्या उष्म्याची लाट आहे. रायगड जिल्ह्यातही उन्हाची काहिली वाढली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा व ऊर्जा मिळण्यासाठी अनेकजण आरोग्यवर्धक निरा आणि ताडगोळ्यांना पसंती देत आहेत. परिणामी निरा आणि ताडगोळ्यांची मागणी वाढली आहे.
मुबंई – गोवा महामार्ग, पनवेल – खोपोली तसेच मुंबई -अलिबाग या मार्गांवर निरा विक्रेत्यांच्या टपर्या पहायला मिळतात. तेथे 10 रुपये ग्लास (250 मिली) दराने निरा सहज उपलब्ध होते. त्यामुळे प्रवासी व स्थानिक या स्वस्त आरोग्यवर्धक आणि चविष्ट पेयाला अधिक पसंती देतात. निरा एक ग्लास पिऊन भागत नाही म्हणून काही जण 2-3 ग्लास सहज फस्त करतात. ही निरा आम्ही अलिबाग वरून आणतो, असे एक निरा विक्रेत्याने सांगितले.
निरा बरोबरच नरम, लुसलुशीत, पाणीदार आणि मधूर चव असलेले ताडगोळेदेखील स्थनिक बाजारात मिळतात. हे ताडगोळे 10 रुपये एक किंवा 50 रुपयांना 6 या दराने मिळतात. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आदी तालुक्यात व किनारपट्टीय भागात हे अधिक मिळतात. तेथूनच स्थानिक महिला जिल्ह्यातील इतर बाजारपेठांत ताडगोळे विक्रीसाठी घेऊन येतात. त्यांनादेखील यामुळे चांगला रोजगार मिळतो.
– निरा पिण्याचे फायदे
उन्हाळ्यात शरीरातील उर्जा टिकवून ठेवण्यास निराची मदत होते. तसेच या दिवसात जाणवणारा थकवा कमी होण्यास मदत होते. निरामुळे डीहायड्रेशनचा त्रास कमी होतो. हृदयविकार किंवा रक्तदाबाचा त्रास असलेले अनेक नागरिक निरा आवर्जून घेतात. एका दिवसात 1-2 ग्लास निरा पिणे शरिराला फायदेशीर ठरते. त्यामुळे कुठलीही जाहिरात केली जात नसतानाही निरा हे पेय लोकप्रिय झाले आहे.
– ताडगोळे खाण्याचे लाभ
उष्माघातापासून बचावण्यासाठी ताडगोळा उपयुक्त आहे. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेचा तडाखा शरीरातील उर्जा कमी करतो. शहाळ्याचं गोड पाणी आणि पातळ मलई जशी आपल्याला रिफ्रेश करते. तसेच ’ताडगोळा’ हे फळ रिफ्रेश करते. ताडगोळ्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणामध्ये राहते. ताडगोळा खाण्याने डीहायड्रेशन आणि उष्माघाताचा त्रास कमी होतो.