खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
शासकीय सुट्याचे शनिवार, रविवार व लागून आलेला नाताळ यामुळे सलग सुट्या आल्या आहेत. या सुट्याचा लाभ व हिवाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे शुक्रवार (दि. 25) सकाळपासूनच मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांची गर्दी वाढल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. खालापूर टोल नाका ते खंडाळा घाट ते खंडाळा प्रवेश या अंतरात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. मात्र आयआरबी डेल्टा फोर्स व महामार्ग वाहतूक पोलिसांनी तात्काळ उपाययोजना करून काही अंशी कोंडी फोडून वाहतूक सामान्य केली. खालापूर तालुक्यातील खोपोली- पेण, खोपोली-पालीमार्गे विविध वॉटर पार्क, पर्यटनस्थळे व समुद्र किनार्यांवर जाणार्या पर्यटकांच्या वाढलेल्या वाहनांमुळे याही रस्त्यांवर शुक्रवार सकाळपासून वाहतूक कोंडी निर्माण होत होती. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेवून वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना बोरघाटातून जाण्यास मज्जाव केल्याने सावरोली टोल नाक्यावर वाहनांची गर्दी झाली. सावरोली टोल नाका ते कुंभिवली पुल या चार किमी अंतरात अवजड वाहनांची कोंडी झाली होती. तर पुण्याहून मुंबईकडे येणार्या वाहनांची संख्या वाढल्याने बोरघाटात द्रुतगती महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. एक्सप्रेस वे आणि इतर सर्व प्रमुख रस्त्यांवर पुढील तीन चार दिवस अशीच वाहनांची गर्दी राहणार असून, वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस, आयआरबी यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय ग्रुपचे सदस्य सतत कार्यरत आहेत. नाताळ सणानिमित्त सलग सुट्ट्या पडल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पर्यटकांच्या वाहनांमुळे खालापूर टोल नाक्यापासून दोन्ही बाजूस तीन चार किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याची दखल घेत खालापुर टोल नाक्यावरील अतिरिक्त लेन उघडून जादा वाहने सोडण्यात येत आहेत.
वाहनांची वाढती संख्या लक्षात घेवून वाहतूक पोलिसांनी अवजड वाहने रोखून धरल्याने टोल नाक्यावर वाहनांची गर्दी झाली होती. मात्र काही वेळातच ही वाहतूक सुरळीत झाली.
-प्रकाश ब्राह्मणकर, प्रमुख, आयआरबी टोल नाका सावरोली, ता. खालापूर
अनेकवेळा चारचाकी वाहनचालक नियम तोडून मनमानी करतात. खंडाळ्यातून उतरणार्या बाजूस विरुद्ध बाजूने गाड्या नेण्यात येतात. त्यामुळे अंडा पॉइंटजवळ नाहक वाहतूक कोंडी निर्माण होते. अशा स्थितीत अपघात होण्याची शक्यता वाढते.
-गुरुनाथ साठेलकर, समन्वयक, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुप
RamPrahar – The Panvel Daily Paper