उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
उन्हाळ्यात वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी उरण येथील फ्रेंड्स ऑफ नेचर या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी नैसर्गिक पाणवठा तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आवरे गावाच्या पूर्वेला असलेल्या कडापे जंगलाच्या भागातील पाण्याचे नैसर्गिक स्तोत्र पुनर्जीवित करण्यासाठी संस्थेच्या वतीने तेथील पाण्याचे झरे सुरू करण्यासाठी मेहेनत घेतली आहे. मानवाला जशी पाण्याची टंचाई निर्माण होते, तशी ती वन्यजीव आणि पक्ष्यांना सुद्धा निर्माण होते. आपण कुठूनही कसेही पाणी मिळवू शकतो, परंतु प्राणी त्यांचं स्थान सोडून इतर ठिकाणी जाताना त्यांना धोका निर्माण होऊ शकतो. एकीकडे बेसुमारपणे जंगलांना लावण्यात येणार्या वणव्याने येथील वन्यजीव पशुपक्षी हैराण झाले असून, त्यांचे जीवन उध्वस्त होऊ लागले आहे. त्यांना संरक्षण राहिले नाही. उरण तालुक्याच्या काही गावाच्या जंगल परिसरात काही नैसर्गिक पाणवठे सुप्तावस्थेत आहेत, तर काहींचे पाणी थोड्या प्रमाणात वर्षाच्या 12 महिने काळ्या पाषाणातून वाहत आहे. त्यामुळे जे सुप्त पाणवठे आहेत त्यापैकी एक पाणवठा पुन्हा पुनर्जीवित करण्याचे कार्य फ्रेंड्स ऑफ नेचरच्या सदस्यांनी केले. या सदस्यांनी वन्यजीवांच्या संवर्धनासाठी उरण तालुक्यातील आवरे-कडापे जंगलातील नैसर्गिक स्तोत्र पाझरण्यासाठी तेथील दगड, माती आणि त्यातील साचलेला पालापाचोळा बाहेर काढून पाणवठा तयार करण्याचा उपक्रम राबविला. या उपक्रमात जयवंत ठाकूर यांची कन्या सृष्टी जयवंत ठाकूर, राजेश पाटील, शेखर म्हात्रे, गोरख म्हात्रे, प्रणव गावंड, निकेतन ठाकूर, राकेश म्हात्रे, किशोर पाटील, अंगराज म्हात्रे आदी सदस्य मेहनत घेत आहेत.