मला आठवतंय, फार पूर्वी रहस्यरंजक चित्रपटाच्या जाहिरातीत म्हटले जात असे, सुरुवात चुकवू नका. शेवट कोणाला सांगू नका.अशा पिक्चरला थोडं लवकरच जायची सवय लागली होती. उगाच पिक्चरची सुरुवात चुकायला नको (आणि एकदा का मेन पिक्चर सुरू झाले की आपल्या शेजारच्याच सीटवरील कोणी धडपडत यायला नको. उगाच पडद्यावरचं लक्ष विचलित व्हायचं.) आणि अशा सस्पेन्स पिक्चरचा शेवट गप्पांच्या ओघात कोणालाच सांगायचा नाही असे स्वतःलाच बजावून सांगून ठेवलेले असे.
जाहिरातीवरील वाक्य वाचायला सोपे, पण त्यात कित्येक गोष्टी दडलेल्या. (हल्लीच्या चित्रपट जाहिरातीत एकच वाक्य असते, जवळच्या चित्रपटगृहात बघा.)असाच एक म्युझिकल रहस्यरंजक चित्रपट अनहोनी… चित्रपटाची सुरुवात अतिशय इंटरेस्टींग, एक्स्प्रेस ट्रेन तुफान वेगाने सुसाट धावत आहे. खडखडाट खडखडाट करीत धावतेय. त्या काळातील थिएटरमधील मोनो साऊंड सिस्टीमही उत्तम वातावरण निर्मिती करे. फर्स्ट क्लासच्या बोगीतून मिसेस राय बहादूर सिंग (कामिनी कौशल्य) आणि त्यांची मुलगी डॉ. रेखा (लीना चंदावरकर) प्रवास करताहेत आणि अगदी अचानक चाकू हातात घेतलेला एक वेडा (संजीवकुमार) त्याच डब्यात त्यांच्या समोर येताच त्या दोघी किंचाळतात. विलक्षण घाबरतात. (आपणही बसल्या जागी दचकतो. होय. त्या काळातील पब्लिक पडद्यावरील गोष्टींशी समरस होई) त्यातून त्या स्वत:ला कसंबसं सांभाळतात. तोही थोडासा नॉर्मल होतो. त्याला असेच सोडून देण्यापेक्षा त्याच्यावर उपचार करावेत. त्याची मानसिक स्थिती ठीक करावी. त्याला नॉर्मल करावे असे डॉ. रेखा ठरवते. त्याला इस्पितळात दाखल करते. घरी आणते. पिक्चरची सुरुवात ही अशी उत्सुकता निर्माण करणारी. सस्पेन्स पिक्चर असाच असावा असे वाटणारे हे वातावरण. तोपर्यंत इंग्लिश चित्रपट हायफाय प्रेक्षकांसाठी आहेत असाच समज होता.
…त्यात तो वेडा (खरंच का?) बरा होत जाताना ती त्याच्याकडे आकर्षित होते. चक्क हळूहळू त्याच्या प्रेमात पडते (ते व्हायलाच हवे) आणि त्याच विश्वासात ती त्याला आपल्या पित्याचे निधन कसे झाले, ती हत्या असावी असे वाटते असे सत्य त्याला अतिशय विश्वासाने व मोकळेपणाने सांगते. तो सगळं व्यवस्थित ऐकून घेतो आणि एक फोन लावतो आणि बोलतो, मी पोलीस इन्स्पेक्टर सुनील बोलतोय… त्याचं हे बोलणे ऐकून रेखा हादरते. (आणि एव्हाना चित्रपटात गुंतलेले आपणही दचकतो. येथे दिग्दर्शक दिसतो असेच म्हणायला हवे.) तिला हा आश्चर्याचा मोठाच धक्का असतो. आपल्यालाही असतोच आणि पडद्यावर येते, मध्यंतर… अचूक टायमिंग. म्हणजेच बाहेर जाऊन पटकन वडापाव घेऊन येवून खुर्चीवर बसायला हवे यासाठीची धडपड.
रवि टंडन दिग्दर्शित ’अनहोनी’ (प्रदर्शन 4 मे 1973)च्या मध्यंतरला आम्ही चित्रपट रसिक भारावून गेलेलो असतो. माझे ते शालेय वय होते आणि माऊथ पब्लिसिटीवर पिक्चर हिट होण्याचे ते दिवस होते. तेव्हा चित्रपट व क्रिकेट यावर नाका, गच्ची, गॅलरी, कट्टा, अड्डा येथे भरभरुन बोलले जात असे. त्यातून पिक्चरचा खरा रिपोर्ट पसरत असे.
’अनहोनी’ मेन थिएटर लिबर्टीत झळकला आणि पिक्चर रहस्यरंजक आहे अशी कानोकानी चर्चा होत गेली आणि चार आठवड्यानी आमच्या गिरगावातील सेन्ट्रल थिएटरला तो शिफ्ट होताच हाऊसफुल्ल गर्दीत एन्जॉय केला… चित्रपट हे समूहासह पहायचे मनोरंजन आहे हे रुजलेला तो काळ होता. म्हणजे पिक्चर एन्जॉय करताना एकटेपण वाटू नये.
याला बावन्न वर्ष झाली कधी झाली हे समजलेच नाही.
मध्यंतरानंतर ’खून कसा झाला? कोणी केला? कशाला केला? का केला?’ याच्या क च्या बाराखडीतून रहस्याचा वेध सुरु होतो. सस्पेन्स पिक्चर म्हणजे सतत टर्न आणि ट्वीस्ट हवेत. आपण चित्रपट पाहताना जसा विचार करतो तसे न घडता, भलतेच घडणे आणि संपूर्ण पिक्चरभर ज्याच्यावर संशय येत नाही तोच नेमका गुन्हेगार असणे अशी पटकथा व दिग्दर्शन असेल तर पिक्चर हिट. ’अनहोनी’च्या अगोदर प्रसाद प्रॉडक्सन्सच्या एल. व्ही. प्रसाद निर्मित व चंदर बोहरा दिग्दर्शित ’खिलौना ’तही संजीवकुमारचा असाच वेडा (पण कारण वेगळे. हा चित्रपट साऊथच्या चित्रपटाची रिमेक होता ) पाहिला असल्याने यावेळी तशा रुपात पाहताना त्याला सहानुभूती राहिली. पण तो तर… हा चकमा म्हणजेच यश आणि पिक्चरमध्ये मध्यंतरानंतर काय घडेल याचे कुतूहल. तेच तर महत्त्वाचे.
सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटांच्या एकूणच यशाची वेगळीच स्टोरी आहे. एकाच वेळेस पौराणिक चित्रपट (जय संतोषी मा) आणि समांतर चित्रपट (निशांत) असे दोन टोकाचे चित्रपट यशस्वी ठरत होते. यासह अनेक प्रकार होतेच. बहुस्तरीय हा शब्द बरोबर ठरावा आणि त्यात एक होता, सस्पेन्स चित्रपट. याच दशकावर ’शोले’चा प्रभाव तसाच ‘छोटीसी बातचा’ही. ‘अमर अकबर अॅन्थनी’ सुपरहिट नि ‘गोलमाल’देखील. सत्तरचे दशक सुपरहिट हिंदी चित्रपटाचा सुवर्णकाळ.
रहस्यरंजक चित्रपटांची पाळेमुळे साठच्या दशकात सापडतात. बी.आर. चोप्रा यांचा ’कानून’ हा कोर्ट रुम ड्रामा यापासून रवि टंडन दिग्दर्शित ’खेल खेल मे’, ब्रीज दिग्दर्शित ’मगरुर’ असा हा जवळपास दीड दोन दशकांचा प्रवास आहे. ’कानून’ चक्क गीतविरहीत होता. सस्पेन्स पिक्चरमध्ये चोरीची गोष्ट (ज्वेल थीफ, तिसरी मंझिल, व्हिक्टोरिया नंबर 203, छुपा रुस्तम, बुलेट, शालिमार, लूटमार), भूताची गोष्ट (बीस साल बाद, कोहरा), खूनाची गोष्ट ( धुंद, परदे के पीछे) असे प्रकार असत. त्यात एक कॉमन फॅक्टर सुपर हिट गीत संगीत व नृत्य यांचा. यात रामसे बंधुंच्या थरारपटाची तर्हाच वेगळी. ते सस्पेन्स कमी आणि भयपट जास्त वाटत. दो गज जमी के नीचे, अंधेरा, दरवाजा, और कौन असे त्यांचे पिक्चर्स पाहिले न पाहिले तरी ते लक्षात येईल. राजा परांजपे दिग्दर्शित ’पाठलाग’ या म्युझिकल रहस्यरंजक चित्रपटावरुन हिंदीत राज खोसला दिग्दर्शित ’मेरा साया’ बनला, तोही सुपर हिट. त्या काळात सस्पेन्स पिक्चर एक यशस्वी जॉनर होता. वह कौन थी, गुमनाम, यह रात फिर न आयेगी, हमशकल, हमराज, आमने सामने, उस्तादों के उस्ताद, परवाना, कब क्यू और कहा, धुन्द, खून खून, बेनाम, फिर वही रात असे बरेच रहस्यरंजक चित्रपट रसिकांनी एन्जॉय केले. यश चोप्रा दिग्दर्शित ’इत्तेफाक’ यात नाट्यमय. हा गीतविरहीत. क्लायमॅक्स अतिशय धक्कादायक असलेला चित्रपट. संपूर्ण चित्रपट परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओत चित्रीत झाला.
एकदा का सस्पेन्स माहीत पडल्यावर तो चित्रपट पुन्हा कशाला बघा असा प्रश्न स्वाभाविक, पण तरीही हे सस्पेन्स पिक्चर मॅटीनी शोला पुन्हा पुन्हा पाहिले जात. याचे कारण त्याचे लोकप्रिय गीत संगीत.
’अनहोनी’चीही मै तो एक पागल, पागल क्या दिल बहेलाए गा, हंगामा हो गया ही गाणी लोकप्रिय. वर्मा मलिक यांच्या गीतांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत. बिंदूच्या धमाकेदार नृत्याची रंजकता असलेले हंगामा हो गया गाणे तुफान लोकप्रिय होते.
पोस्टरभरचा दाढीधारी आणि हाती चाकू घेतलेला संजीवकुमार ’अनहोनी’ची जातकुळी स्पष्ट करीत होता. थीमनुसार पोस्टर हवे ते हे असे. येथे दिग्दर्शक दिसतो म्हणूयात. बावन्न वर्षांनंतरही हा इफेक्ट कायम आहे हो. जुन्या काळातील चित्रपटांची ती ताकद आहे.
आज असे म्युझिकल रहस्यरंजक चित्रपट का बनत नाहीत हा प्रश्न निर्माण होत असला तरी त्याचे उत्तर कोण देणार? ते एक रहस्यच राहिलयं. ’इत्तेफाक ’ची रिमेक आली, पण रंगली नाही, याचं कारण मूळ चित्रपटातील नायिकेभोवती (नंदा) ड्रामा होता. ’खेल खेल मे’वरून ’खिलाडी’ बनला, पण मूळ चित्रपटातील प्रेमाच्या गोष्टीतील विघ्न आणि रहस्याचा चकमा भारी होता. अगदी ज्वेल थीफ चीही रिमेक आली. त्यात तोही रंगला नाही. ’अनहोनी’वरून ’छोटे सरकार’ बनताना नायिकेभोवती (शिल्पा शेट्टी) थीम रचल्याने ड्रामा खुललाच नाही. यात नायकाकडून (गोविंदा) अनवधनाने गुन्हा घडतो आणि नायिका पोलीस इन्स्पेक्टर असते अशी गोष्ट फिरवण्यात आली. त्या काळात गोविंदाच्या चित्रपटांच्या अफाट पिकात हा चित्रपट आला नि गेलादेखील.
दिग्दर्शक रवि टंडनने अनहोनीच्याच हिट टीमला (संजीवकुमार व लीना चंदावरकर) घेऊन अपने रंग हजार (1975) बनवला, ती खेळीही फसली. त्यातले किशोरकुमारने छान मस्तीत गायलेले आणि संजीवकुमारने तेवढ्याच गमतीदारपणे साकारलेले मेरी काली कलुटी के नखरे बडे हे गाणे लोकप्रिय झाले इतकेच. पिक्चर मात्र रसिकांनी नाकारले. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीने ओटीटीवर ‘अनहोनी’ पहायला काहीच हरकत नाही.
Check Also
‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम
दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper