शेकापचे ज्येष्ठ नेते मारुती गायकर यांचा समर्थकांसह पक्षप्रवेश
पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी नेहमीच तत्परता दाखवली आहे. इतर पक्ष केवळ विचार करत असताना भाजप थेट कृती करून दाखवतो. त्यामुळेच भाजपवर लोकांचा विश्वास वाढत आहे आणि हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने काम करीत राहील, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलजवळील करंजाडे येथे केले.
शेतकरी कामगार पक्षाला आणखी एक धक्का बसला असून पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मारूती गायकर यांनी त्यांच्या समर्थकांसह शनिवारी (दि. 3) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला.
या वेळी आमदार महेश बालदी यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले आणि स्वच्छ, सुंदर करंजाडे या संकल्पनेतून विकास करण्याची ग्वाही दिली. आगामी काळात करंजाडेच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी शेकापचे ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच मारूती गायकर, माजी सदस्य संतोष आंग्रे, नंदा गायकर, वंदना पोपट, कल्पना गायकर, ठकूबाई वाघे तसेच करंजाडे नोड आणि आदिवासीवाडीतील अनेक कार्यकर्त्यांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले.
RamPrahar – The Panvel Daily Paper