महानगर गॅस आणि पेट्रोल पंपांवर कारवाईची मागणी

पनवेल : प्रतिनिधी
डिजिटल इंडियाचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहत असताना पनवेल महानगरपालिका हद्दीत महानगर गॅस पंपावर आणि अनेक पेट्रोल पंपांवर डेबिट कार्डने पेमेंट स्वीकारण्यास नकार देऊन ग्राहकांची अडवणूक करून त्यांची लूटमार करण्याचा धंदा सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीत महामार्गावरून सीकेटी महाविद्यालयाकडे जाण्याच्या रस्त्यावर असलेल्या महानगर गॅस पंपावर गाडीत गॅस भरल्यावर डेबिट कार्डने पेमेंट स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. प्रत्येक वेळी मशीन बंद असल्याचे कारण सांगितले जाते, पण प्रत्यक्षात चौकशी केली असता अनेक ग्राहकांनी हे कारण खोटे असून डेबिट कार्डने पेमेंट घेतल्यास जेवढे बिल आहे तेवढेच पैसे घेता येतात आणि रोख घेतल्यास 42 रुपयांचे 45 रुपये किंवा 38 चे 40 रुपये घेता येतात. त्यामुळे प्रत्येक ग्राहकामागे 2-3 रुपये जास्त घेता येतात. दिवसभरात हजारो रुपये जास्त मिळतात.
यामुळेच महानगर गॅसचे पंप आणि इतर पेट्रोल पंपावर डेबिट कार्ड मशीन बंद असल्याचे कारण सांगून ग्राहकांना लुटण्याचा धंदा खुलेआम सुरू आहे. याबाबत महानगर गॅस कंपनी, पेट्रोल कंपन्या आणि शासकीय यंत्रणांनी अशा पंपांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक करीत आहेत.