Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

भरघोस रकमेची पारितोषिके; सर्वोत्कृष्ट भजनी मंडळाला 51 हजार रुपये बक्षीस

पनवेल : रामप्रहर वृत्त
गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 23 व दिनांक 24 ऑगस्ट रोजी रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा पनवेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने भजन परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे.
पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणारी जिल्हस्तरीय भजन स्पर्धा पुरुष खुला गट आणि महिला खुला गट अशा दोन गटात होणार असून प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट आहे.
स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 51 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 25 हजार रुपये, तृतीय क्रमांकास 15 हजार रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक सात हजार रुपये, तसेच उत्कृष्ट पखवाज वादक व उत्कृष्ट तबला वादक यांना प्रत्येकी सात हजार रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
भजन स्पर्धा प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी अशा दोन टप्प्यात होणार असून प्राथमिक फेरी ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या सर्वोत्तम पुरुष 15 व महिला 15 स्पर्धक भजन मंडळांना अंतिम फेरीसाठी आमंत्रित करण्यात येईल. प्राथमिक फेरीत भाग घेण्यासाठी 2 ते 3 मिनिटांचा साउंड सिस्टिम न वापरता शुटींग केलेला नॉन एडिटेड व्हिडीओ 9167474507 या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप करावा तसेच सदर व्हिडिओ आणि मंडळाची माहिती अर्थात मंडळाचे नाव, सहभागी कलाकारांची नावे, भजन स्पर्धेच्या किमान सात दिवस अगोदर पाठवावी.
अंतिम फेरीत निवड झाल्यावर प्रत्यक्ष सादरीकरण करताना मुख्य गायक-वादकांसह कमीत कमी सहा जणांचा आणि जास्तीत जास्त 12 जणांचा समावेश असावा. अंतिम फेरीत भजन सादरीकरणासाठी 20 मिनिटांचा निर्धारित वेळ असणार आहे. त्यामध्ये श्लोक, भजन, एक अभंग आणि एक गौळण सादर करणे आवश्यक असणार आहे. सादरीकरणासाठी घेतलेले अभंग आणि गौळण हे संताचेच असावेत. (रचलेले अभंग, स्वरचित काव्य, गौळण, भक्तिगीत ग्राह्य नाहीत) तसेच अभंग सादरीकरण करताना फिल्मी चालीत अभंग गाऊ नये.
निवड झालेल्या मंडळींनी अंतिम फेरीसाठी निर्धारित वेळेच्या एक तास अगोदरच उपस्थित राहणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी लागणारे साहित्य आणि वाद्ये भजन मंडळांनी स्वतःची आणावी. त्यामध्ये तबला, पेटी, टाळ, पखवाज हे चार आणि कोरस तीन असे एकूण असावेत. प्राप्त परिस्थितीनुसार कार्यक्रमात फेरबदल करण्याचा आयोजकांना अधिकार राहिल तसेच परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असणार आहे तसेच स्पर्धेतील गायक, वादक, चकवा, वादक किंवा कोणतेही कोरस दुसर्‍या मंडळात सहभागी होऊ शकणार नाही. त्याचबरोबर भजन सादरीकरण करताना पारंपारिक पोषाख पेहराव असावा, अशी स्पर्धेची नियमावली आहे.
अधिक माहितीसाठी सागर राजे (9224344136), नारायणबुवा (7715835424), अभिषेक पटवर्धन (9029580343), उमेशबुवा चौधरी (9324824205), चंद्रकांत मने (9768656484), विनोद तोडेकर (7045822548), जगदीश म्हात्रे (9326812196), पूनम ठाकूर (7208776005), पवन राजे (9221097337), अनिल कोळी (9167474507) किंवा मच्छिंद्र पाटील (9004048630) यांच्याशी संपर्क साधावा तसेच रायगडमधील सर्व भजनी मंडळांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply