Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, अभिनेते पुष्कर श्रोत्री, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
महिलांना उद्योजक बनवण्यासाठी राज्यात विविध योजना राबवल्या जात आहेत. राज्यातील महिला लखपती आणि आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत, हे उद्दिष्ट प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य महिला व बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून सातत्याने होत आहे, असे प्रतिपादन या खात्याच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी रविवारी (दि.२) पनवेल येथे केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने पनवेल विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी विरूपाक्ष मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. शिबिराला सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री साकोरे-बोर्डीकर बोलत होत्या.
या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या महसूलविषयक विविध तक्रारी व शासकीय कामांचा निपटारा एकाच छताखाली जलद गतीने करण्यात आला. जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, सातबारा उतारे आणि इतर आवश्यक कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले.
यावेळी ना. मेघना बोर्डीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बळीराजाला बळीराजा म्हणण्याचे दिवस आता गेले असून तो खऱ्या अर्थाने अन्नदाता आहे. त्या अन्नदात्याला स्वावलंबी बनवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार देशात व राज्यात कार्यरत आहे. देशातील शेतकऱ्यांच्या मालाला दरवर्षी हमीभाव वाढवून देण्याचे काम सातत्याने केले जात आहे तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या विविध संधी आपल्या परिसरात उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे नियोजन सुरू आहे.
राज्यभरात समाधान शिबिराच्या माध्यमातून १० लाख लोकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट होते, परंतु एकट्या रायगड जिल्ह्यातूनच सव्वादोन लाखांहून अधिक नागरिकांना या शिबिरांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे, याबद्दल मंत्री बोर्डीकर यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, आमच्यासारखे कार्यकर्ते हे शासकीय योजना आणि त्यांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी एका पुलाप्रमाणे काम करत आहेत. सरकारने योजना आणल्यानंतर ती लोकांपर्यंत पोहचवणे आणि नागरिकांच्या समस्या सरकारपर्यंत मांडणे यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल होत आहे. हे काम केवळ एका दिवसापुरते मर्यादित नसून वर्षाचे ३६५ दिवस सातत्याने सुरू असते. सरकारच्या योजनांचा लाभ थेट ग्रामपंचायतींपर्यंत आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी आमचे सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य कमला देशेकर, प्राची जाधव, सोनाली जितेकर, पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, आरती काठे, वैशाली सावंत, वर्षा केवाळे, महापालिकेचे स्थायी समिती सभापती बबन मुकादम, नगरसेवक मनोज भुजबळ, रामदास शेवाळे, सुमित झुंजारराव, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सरपंच सीताराम चौधरी, आनंद ढवळे यांच्यासह लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनवेल मतदारसंघातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा प्रत्यक्ष लाभ घेत विविध दाखले व शासकीय कामे तत्परतेने पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Check Also

हवस @५२ वर्षे

तेरी गलियो मे ना रखेगे कदम आज के बाद… चित्रपट अभिनय प्रशिक्षण केंद्रात एकाच वेळेस …

Leave a Reply