पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी रेल्वे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान उरण ते नेरूळ या महत्त्वपूर्ण रेल्वेमार्गाच्या संदर्भात केंद्रातील संबंधित अधिकार्यांशी सविस्तर चर्चा झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच सध्याच्या 40 फेर्यांऐवजी 50 फेर्या सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून लवकरच अंमलबजावणी होणार आहे. यामुळे उरण व नेरूळ परिसरातील प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सुकर, सोयीस्कर आणि वेळेवर होणार आहे.
या बैठकीत केवळ रेल्वेमार्ग, फेर्या वाढविण्याबाबतच नव्हे; तर प्रवाशांना भेडसावणार्या इतर प्रश्नांवरही सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. स्टेशनवरील सुविधा, वेळापत्रकातील नियमितता, तांत्रिक अडचणी आणि स्थानिक गरजांबाबत मांडणी करून त्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरच ठोस पावले उचलली जाणार आहेत.
उरण-नेरूळ परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नेहमीप्रमाणेच मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या निर्णयामुळे स्थानिक प्रवाशांना दिलासा मिळणार असून रेल्वेसेवेमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे, असे आमदार महेश बालदी यांनी सांगितले.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी
भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …
RamPrahar – The Panvel Daily Paper