Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वकर्तृत्वाने जीवनाचे पान भरले -बाळासाहेब पाटील

रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सर्वसामान्यांच्या दुःखाशी जोडलेले राहणे, समाजकारणात पारदर्शकता ठेवणे आणि कोणत्याही परिस्थितीत सत्य बोलण्याची तयारी ठेवणे हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य असून त्यांनी स्वकर्तृत्वाने जीवनाचे पान भरून ठेवले आहे, असे गौरवोद्गार कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी (दि. 23) येथे काढले.
गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते व पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर व कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते.
उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, भाजप माजी शहर अध्यक्ष अनिल भगत, जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उपाध्यक्ष गणेश कडू, प्रल्हाद केणी, पं. शंकरराव वैरागकर, बंडाराज घाडगे, नंदकुमार पाटील, हभप निवृत्तीबुवा चौधरी, शंकुनाथबुवा पडघेकर, महादेवबुवा शहाबाजकर, ‘सारेगम’फेम जितेंद्र तुपे, इंडियन आयडॉल विजेता सागर म्हात्रे, भाजप पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, जे. टी. पाटील, संतोषबुवा पाटील, आध्यात्मिक समन्वय आघाडी कोकण संयोजक मोहन म्हात्रे, सुचिता वांजळे, आयोजन समितीचे पं. उमेश चौधरी, वसंतबुवा पाटील, पूनम ठाकूर, अभिषेक पटवर्धन, गणेश जगताप, नारायणबुवा पाटील, चंद्रकांत मने, जगदिश म्हात्रे, पवन राजे, शैलेश वाजेकर, विनोद तोडेकर, प्रसाद पाटील, सागर राजे यांच्यासह भजन मंडळी उपस्थित होती.
बाळासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटले की, अशी काही व्यक्तिमत्व असतात, जी कर्तृत्वाने इतकी मोठी असतात की त्यांचा वाढदिवस एक-दोन दिवस नाही, वर्षभर नाही, तर पुढचे अख्खे आयुष्य साजरा केला तरी कमी पडेल असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे व्यक्तिमत्व आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे ते असून त्यांचे हात गगनाला लागले तरी पाय जमिनीवर आहेत. आज मी कितीही पुढे गेलो असलो तरी आपली जुने दिवस न विसरताना सगळ्यांचे दुःख जाणणारे असे ते आहेत. अशी काही व्यक्तिमत्त्व असतात की, त्यांच्या वाढदिवसाला काही लोकांना खेचून आणले जाते तसे प्रेम निर्माण होते, कारण सच्चाई ज्यांच्या मनामनात, नसानसात भरलेली आहे असे ते आहेत. भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून मी गुणगान कौतुक करत नाही, तर दुसर्‍या पक्षात असतानाही विरोधक म्हणून त्यांच्यावर बोट ठेवण्याची संधी आम्हाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कधी दिली नाही.
आयुष्यामध्ये राजकारणात किंवा समाजकारणात तीन गोष्टी आपण त्याला ’तीन सी’ ज्याला म्हणतो कल्चर, कॅरेक्टर व करप्शन या तीन गोष्टींपासून सांभाळून वाटचाल करावी लागते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी क्लचरल म्हणून आपली संस्कृती सांभाळली आणि कॅरेक्टरमध्ये इतक्या वर्षामध्ये चुकीचे काम त्यांनी केले नाही याचा साक्षीदार मी आहे तसेच दूरदूरपर्यंत करप्शनचे कुठेही नाव जोडला जाणार नाही असे लोकनेते रामशेठ ठाकूर आहेत आणि अशा नेत्याचा वाढदिवस खर्‍या अर्थाने साजरा करणे म्हणजे आम्ही सगळे स्वतः भाग्यवान समजतो, असे सांगून बाळासाहेब पाटील म्हणाले की, मला जे थोडेसे जीवन कळले त्याच्यामध्ये मला असे वाटते की, हे जीवन जे आहे ते फक्त तीन पानाचे पुस्तक आहे. पहिले पान म्हणजे आपला जन्म जो ईश्वराने लिहून आपल्याला दिलेला असतो. तिसरे पान म्हणजे मृत्यू तोसुद्धा ईश्वराने आधीच निश्चित केलेला असतो, पण यामधील एक महत्त्वाचे पान आपल्या हातात असते ते म्हणजे मधले पान आपले आयुष्य कसे घडवायचे, कसे जगायचे आणि काय मागे ठेवायचे हे ठरवणारे पान आहे. हे मधले पान आपण कशा प्रकारे भरतो यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाची किंमत ठरते. काही लोक हे पान रिकामे ठेवतात, काही साध्या ओळीत भरतात, तर काही थोर व्यक्ती आपल्या कर्माने, विचाराने आणि कार्याने हे पान सुवर्णाक्षरांनी भरून ठेवतात. अशा व्यक्तिमत्वाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर. त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने, लोकसेवेने, शैक्षणिक आणि सामाजिक कार्याने जीवनाचे मधले पान अतिशय समृद्ध करून ठेवले आहे. त्यामुळे त्यांचे आयुष्य एक शिकवण आहे.
या सोहळ्याचे प्रास्ताविक श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव व पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले. अध्यात्म हे महाराष्ट्राचे भूषण असून आपली संस्कृती संपूर्ण देशात पोहचली आहे. राज्य सरकारने याची दखल घेत भांडवली अनुदान म्हणून 1800 भजन मंडळांना प्रत्येकी 25 हजार रुपये देण्याची घोषणा केली असून त्याबद्दल सरकारचे परेश ठाकूर यांनी आभार मानत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सातत्याने अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असून या पुढेही आयोजन करत राहणार आहे, असे त्यांनी प्रास्ताविकात नमूद केले.

महाराष्ट्र आपली संतांची भूमी आहे. भजनाची आवड निर्माण करण्याचे काम ज्येष्ठांनी केले. त्यामुळे युवक मोठ्या प्रमाणात भजन क्षेत्रात सहभागी आहेत. निवृत्तीबुवा चौधरी यांनी 25 वर्षांपूर्वी जिल्ह्यात भजनाची चळवळ उभारली आणि त्या चळवळीला चालना देण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
-जे.एम. म्हात्रे, माजी नगराध्यक्ष

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply