पनवेल ः रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला साहित्यिकांचा गौरव सोहळा आणि कविसंमेलन हा साहित्यशील, संस्कृतीप्रधान व रसिकतेने नटलेला कार्यक्रम शनिवारी
(दि. 15) सायंकाळी मार्केट यार्डमधील मंडळाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, माजी उपमहापौर व जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कोमसाप पनवेल शाखेचे माजी अध्यक्ष रोहिदास पोटे यांच्या गझलगंधाक्षरी ग्रंथाला प्रभाकर पाटे स्मृती समीक्षा पुरस्कार मिळाल्याबद्दल या वेळी त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. नवीन पनवेल शाखेचे माजी अध्यक्ष प्रा. चंद्रकांत मढवी यांनाही उधळ्या कांदबरीला वि.वा. हडप स्मृती विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांची केंद्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल व शाखेच्या सक्रिय सदस्य योगिनी वैदू यांना रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान केला गेला. ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांची राज्य शासनाच्या वंदे मातरम् गीताच्या 150व्या वर्धापन दिन समितीवर तालुकास्तरीय प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.
या वेळी कविसंमेलन रंगले. सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर, प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख यांच्यासह उपस्थित कवींनी सादर केलेल्या कवितांनी सभागृह भारावून गेले. सामाजिक वास्तव, मानवी नात्यांची उब, निसर्ग, अनुभवांचे रंग आणि भावविश्वाचे विविध पैलू कवितांमधून खुलून आले. या संमेलनाने पनवेलमधील साहित्यिक वातावरणाला नवी ऊर्जा मिळाली.
समारोपाच्या भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, मनाला समाधान पाहिजे असेल, आयुष्याच्या धकाधकीत क्षणभर विश्रांती हवी असेल, तर हिल स्टेशनला जाण्यापेक्षा कविसंमेलनात या. शब्दांची ही मैफल मनाला नवी ऊर्जा देते तसेच त्यांनी सर्व कवींच्या सादरीकरणाचे कौतुक करताना कोमसाप नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी व सहकार्यांचे दर्जेदार आयोजनाबद्दल अभिनंदन केले.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper