मणिपूर ः वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या अपयशानंतर काँग्रेसचे अंतर्गत वातावरणही खराब झाल्याचे दिसत आहे. देशभरातील मोठ्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झाल्याचे दिसत आहे. मणिपूरमधील काँग्रेसच्या तब्बल 12 आमदारांनी मणिपूर काँग्रेस कमिटीतील त्यांना असलेल्या विविध पदांचे राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी पक्षाकडे राजीनामे सोपवत आम्ही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे अनुकरण करत असल्याचे सांगितले आहे.
मणिपूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गैखंगम यांना पक्षाच्या 12 आमदारांनी राजीनामे सोपवले आहेत. आमदारांनी सांगितले की आम्हाला काँग्रेस पक्षाची काहीच अडचण नाही. आम्ही केवळ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे अनुकरण करत आहोत. आमच्या राजीनाम्याचे केवळ हेच कारण आहे.
सर्व आमदारांकडे पक्षाच्या विविध पदांची जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशभरात मिळालेल्या अपयशानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जबाबदारी स्वीकारत स्वतःच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. मात्र काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांचा राजीनामा फेटाळण्यात आला होता. मणिपूरमधील दोन्ही लोकसभा जागांवर काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मणिपूर काँग्रेस कमिटी अध्यक्ष गैखंगम यांनी सांगितले की, माझ्याकडे काही सहकार्यांनी राजीनामे सोपवले आहेत, मात्र मी अजुनही कोणत्याही पत्रकावर स्वाक्षरी केलेली नाही. राहुलजींनी पक्षाला बळकटी देण्याच्या उद्देशाने आपला राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेस कमिटी स्तरावर देखील आम्हाला याचे पालन करावे लागेल. काँग्रेस कार्यकारिणी समितीच या 12 आमदारांच्या राजीनाम्याबद्दलचा निर्णय घेईल.