पेण : चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाच्या रायगड युनिट पेण तर्फे प्रतीपालीत विद्यार्थ्यांना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व रायगड युनिटचे प्रकल्प प्रमुख डॉ. किशोर देशमुख यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे व शैक्षणिक खेळण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दफ्तर, पाठ्यपुस्तके, वह्या, रजिस्टर, चित्रकला वह्या, पेन्स, रेनकोट, छत्री आदि शैक्षणिक साहित्यासह लर्निंग किट, भातुकली, कार सेट, दोरीउडया रोप, हौजी गेम, लुडो, रबररींग इत्यादी खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले.
उत्तम गॅल्व्हाच्या प्रदूषणाबाबत जनसुनावणी
खालापुर : तालुक्यातील पोलाद स्टील उत्पादन व विद्युत निमिर्ती करणार्या उत्तम गॅल्व्हा कारखान्याच्या प्रदूषण व पर्यावरणाच्या बाबतीत परिसरातील नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उप प्रादेशिक अधिकार्यांच्या वतीने शुक्रवारी (दि. 31) दुपारी 1 वाजता नारंगी ग्रामपंचायत कार्यालयात जनसुनावणी लावण्यात आली आहे. सुनावणीत नारंगी, वडवळ, होनाड, सांगडेवाडी, होराळे, निफान, खालापूर, सावरोली, सारसन, साजगाव, ढेकू, ठाणेन्हावे, दहागाव छत्तीशी विभागातील ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा व आपल्या सूचना व तक्रारी सुनावणी सुरु होण्याच्या अगोदर लेखी स्वरुपात द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
माणगाव विळे येथून दुचाकी चोरीला
माणगाव : तालुक्यातील विळे येथून घराच्या पाठीमागे पार्क करुन ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना नुकतीच घडली. विवेक अशोक शालियन यांनी त्यांच्या मालकीची 30हजार रुपये किमतीची पल्सर 150 दुचाकी (एमएच-06,बीक्यु-0277) आपल्या विळे येथील रहात्या घराच्या पाठीमागील बाजूस पार्क करुन ठेवली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. या घटनेची फिर्याद माणगांव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक वडते करीत आहेत.
दुचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू
पाली : पाली-खोपोली मार्गावरील पेडली बाजारपेठनजीक बुधवारी (दि.29) एका दुचाकीने पादचारी वृध्द महिलेला धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या महिलेला उपचारसाठी परळीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पेडली बाजारपेठेत बबी बारकू पवार (वय 80, रा. मुळशी आदिवासीवाडी, ता. सुधागड) या रस्ता ओलांडताना असताना पाली बाजूकडून खोपोलीबाजूकडे जाणार्या मोटारसायकल (एमएच-08, बीवाय-9250) ची धडक बसून अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या बबी पवार यांना उपचाराकरीता तातडीने परळीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.