पनवेल ः प्रतिनिधी : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्त्व ओळखून त्याला प्रथम प्राधान्य देत स्वच्छ भारत अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 10 जूनदरम्यान पनवेल महापालिका हद्दीत महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटजवळील मोकळा भूखंड येथून झाला.
कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा संघटन सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेवक तथा शहर सरचिटणीस नितीन पाटील, प्रभाग समिती सभापती तेजस कांडपिळे, शत्रुघ्न काकडे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अनिल भगत, संतोष शेट्टी, राजू सोनी, नगरसेविका मुग्धा लोंढे, राज्य परिषद सदस्य सी. सी. भगत, माजी नगरसेवक प्रदीप सावंत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, नीता माळी, गणेश वाघिलकर, राम राऊत, केदार भगत, मनोहर मुंबईकर, रवींद्र नाईक, भीमराव पोवार, अमरिश मोकल, सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार, मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, लीना पाटील, सपना पाटील यांसह सामाजिक कार्यकर्ते, महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे भरीव योगदान आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभियानात महापालिकेतील सर्व 20 प्रभागांतील रस्ते साफसफाई, गटार, पदपथ, मोकळे भूखंड, सार्वजनिक बागा आदी परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. याबरोबरच औषध फवारणी करून स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यासाठी लागणारी मशिनरी, मनुष्यबळ, पावडर आदी सामग्री विकास मंडळाच्या वतीने पुरवण्यात येत असून, महापालिकेचेही सहकार्य त्यास लाभत आहे. या अभियानानंतरही स्वच्छतेवर भर देत संपूर्ण परिसर कायम स्वच्छ
ठेवण्यात येणार असून यावर लक्ष देण्याची जबाबदारी मनपाचे आरोग्य निरीक्षक, नगरसेवक आणि भाजप पदाधिकार्यांवर सोपवण्यात आली आहे.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वच्छता अभियानाच्या आयोजनाबद्दल सर्वांचे आभार मानून कौतुक केले. मानवी जीवनात स्वच्छतेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी मोहीम सुरू केली ती सतत पुढे चालू राहावी आणि यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहनही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी केले.
सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेच्या चळवळीचे नेतृत्व करताना जनतेने महात्मा गांधींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन जनतेला केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: हाती झाडू घेऊन ना गंदगी करेंगे, ना करने देंगे, असा मंत्र दिला. त्यांनी उचललेल्या या महत्त्वपूर्ण पावलांमुळे यापूर्वी कधीही नव्हती तेवढी स्वच्छता देशात झाली. तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने स्वच्छता अभियान राबविले जात आहे. स्वच्छता अभियानामुळे सर्वसामान्यांत स्वच्छतेची जाणीव निर्माण झाली आहे. यामध्ये सामाजिक संस्था आणि लोकांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार असून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्वच्छता अभियानामुळे पनवेलला आवश्यक असलेली मोहीम यानिमित्ताने पूर्ण होत आहे, असेही आ. ठाकूर म्हणाले.
श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव तथा महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्वच्छता अभियानाची माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली. स्वच्छता अभियानाबाबत लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आग्रही राहिले असून, महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनीही महापालिका हद्दीत स्वच्छतेवर भर दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. तसेच रविवार दि. 2 जून रोजी खारघर शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून सामाजिक संस्था, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. स्वच्छ परिसर, हवा, पाणी, वातावरण कोणाला नको असते. स्वच्छतेने रोगराई नाहीशी होते. आजार पसरत नाहीत आणि आपली जीवनशैलीही बदलते. आरोग्य हेच धन, अशी म्हण प्रचलित आहे, पण आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी काही सवयी अंगीकारण्याची गरज असते. यापैकी सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे स्वच्छता. आरोग्य हे पैशांपेक्षा मौल्यवान आहे. गमावलेले पैसे कमावता येऊ शकतात, पण आरोग्य परत मिळवणे कठीण असते. म्हणून आरोग्यदायी सवयी लावणे महत्त्वाचे आहे. मानवी शरीर आणि मन जोडलेले आहेत. त्यामुळे जर आपले शरीर स्वच्छ असेल, तर मनही उल्हासित राहते. निरोगी जीवनशैली आणि आरोग्यदायी सवयी असलेल्या व्यक्ती दीर्घ आणि सुखी जीवन जगतात. त्यामुळे स्वच्छतेचे महत्त्व मनात ठासून भरले पाहिजे. या अनुषंगाने पनवेलमध्ये सुरू असलेले महास्वच्छता अभियान सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.