खारघर : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेने अधिकार्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक विभागात हालचाल नोंदवही ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 21 रोजी पालिका मुख्यालयाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी परिपत्रक काढून सर्व विभागातील अधिकार्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
कार्यालयीन वेळेत अधिकारी संबंधित विभागात नागरिकांना उपलब्ध होत नसल्यामुळे परिवर्तन सामाजिक संघटनेचे महादेव वाघमारे यांनी यासंदर्भात पालिका आयुक्तांकडे अशाप्रकारे हालचाल नोंदवही उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पालिकेतील सर्व विभागात अशाप्रकारे हालचाल नोंदवही कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेत कर्मचारी आणि अधिकार्यांनी त्यांना नेमून दिलेल्या कार्यालयीन वेळेत उपलब्ध असणे क्रमप्राप्त आहे, मात्र कार्यालयीन कामासाठी काही वेळेला कर्मचारी अधिकार्यांना कार्यालयाच्या बाहेर देखील जावे लागते.
बाहेर जाताना विभागातील कोणत्याच कर्मचार्यांना संबंधित कर्मचारी, अधिकारी कुठे गेला याची माहिती नसेल, तर कामकाजात अडथळा निर्माण होतो. काही कामासाठी नागरिक महापालिकेत गेले असता अधिकारी कामानिमित्त बाहेर गेले आहेत, तसेच काही वेळेला उडवाउडवीची उत्तरे संबंधित कर्मचार्यांकडून दिली जातात. अशा वेळेला कामानिमित्त आलेल्या व्यक्तीला ताटकळत उभे राहण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो, मात्र हालचाल नोंदवहीमुळे नागरिकांना संबंधित अधिकारी कुठे गेले आहेत याची तत्कळ माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे या निर्णयाचा नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या परिपत्रकाची नोंद सर्व खातेदार व विभागप्रमुखांनी घ्यावी. या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या सूचना उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी काढलेल्या परिपत्रकात दिल्या आहेत.