सुरक्षा साधनांविना उतरतात गटारात
खोपोली ः प्रतिनिधी : मान्सूनपूर्व गटारी व नालेसफाईची कामे खोपोलीत सर्व प्रभागात सुरू आहेत. यासाठी नगरपालिका सार्वजनिक स्वच्छता विभागाकडून कंत्राटी पध्दतीने अतिरिक्त मनुष्यबळ वापरून कामे केली जात आहेत. यातील बहुतांश कामगार हे मागासवर्गीय व आदिवासी समाजातील आहेत, मात्र या कामगारांना गटारीत व नाल्यात उतरविण्यापूर्वी तेथील गाळ व कचरा काढण्यासाठी आवश्यक कोणतीही सुरक्षा साधने देण्यात येत नसल्याचे संतापजनक चित्र सर्वत्र दिसत असल्याने नगरपालिकेकडून या कामगारांचे आरोग्य धोक्यात टाकण्यात येत आहे.
नुकतेच खोपोली नगरपरिषदेकडून पावसाळापूर्व स्वच्छता मोहिमेंतर्गत प्रभाग क्र. 11मधील विणानगर येथे नाले व गटारी सफाईचे कामे चालू झालीत, मात्र सदरचे काम चालू असताना नाल्यात काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांना हॅण्डग्लोज, नोजमास्क, गमबूट आदी आवश्यक सुरक्षा साधने दिली गेली नाहीत. कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय हे कामगार गटारीत उतरून गाळ व कचरा हाताने बाहेर टाकत होते. सदर प्रकार प्रभागाच्या नगरसेविका अपर्णा मोरे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी कामगारांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत होत असलेल्या दुर्लक्षाबाबत तीव्र संताप व्यक्त केला. तसेच प्रभागाचे मुकादम बबन वाघमारे यांना धारेवर धरून सदर सर्व कामगारांना तत्काळ आवश्यक ती सर्व सुरक्षा साधने देण्यास सांगितले. त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकारी व मुख्याधिकार्यांनाही सदर प्रकाराची माहिती देऊन नाराजी व्यक्त केली.
नालेसफाई व गटार साफसफाई करणार्या कामगारांसाठी अतिरिक्त सुरक्षा साधने पालिकेकडून मागविण्यात आली आहेत. अनेक प्रसंगी काम करणार्या कामगारांना सांगूनही ते ही साधने वापरत नाहीत, मात्र तरीही या कामगारांना सुरक्षा साधने देणे व ते वापरण्यासाठी आग्रही असणे ही संबंधित मुकादमाची जबाबदारी आहे. याबाबत सर्व मुकादम व निरीक्षकांना कडक सूचनाही दिल्या आहेत.
-गजानन जाधव, आरोग्य विभागप्रमुख, खोपोली नगरपालिका