Breaking News

नवी मुंबई विमानतळाच्या भरावाचे काम अंतिम टप्प्यात

डिसेंबरपर्यंत होणार काम पूर्ण

मुंबई ः प्रतिनिधी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भरावाचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत 93 टक्के काम पूर्ण झाले आहे. या विमानतळासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाशी संबंधित सवलत करारनाम्यांना मुद्रांक शुल्कातून व गौण खनिजावर आकारण्यात येणार्‍या स्वामित्व धनातून सूट देण्याचा निर्णय बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने सर्व समाज घटकांच्या हितासाठी नुकतेच सात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्णयाचाही समावेश आहे. मुंबई विमानतळावरील भार कमी करण्यासाठी नवी मुंबईत पर्यायी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू करण्यात आले आहे. सिडकोकडून 1160 हेक्टरवर 16 कोटी खर्चून हे विमानतळ उभारले जात आहे. उलवे नदीचा प्रवाह बदलण्याचे काम सुरू असून अनेक गावांचे स्थलांतरही करण्यात आले. 10 गावांच्या जमिनी विमानतळासाठी संपादित करण्यात आल्या असून डिसेंबरपर्यंत या विमानतळाच्या विकासाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे.

सिडकोने दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेकडील साडेतीन किलोमीटरच्या धावपट्टीच्या कामाला सुरुवात झाली आहे. खाडीवर उभारण्यात आलेल्या या विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. अशा वेळी यंदाचा पावसाळा सिडकोच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. पाण्याचा निचरा कशा प्रकारे होतो याकडेही सिडकोचे लक्ष राहणार आहे. 10 गावांतील जवळपास सर्वच प्रकल्पग्रस्तांचे 85 टक्के स्थलांतराचे काम पूर्ण झाल्याची माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रतांबे यांनी दिली. मागच्या वर्षी विमानतळ परिसरात असलेल्या डुंगी गावात पाणी साचले होते. यावर्षी ठिकठिकाणी पंपाची व्यवस्था करण्यात येणार आहे, तसेच मागच्या वर्षी गावात आलेल्या पाण्याचा अभ्यास करून यावर्षी असा प्रकार घडणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात आल्याची माहितीही प्रिया रतांबे यांनी दिली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply