संचालक जनार्दन कंधारे, विनोद भगत यांचा भाजपतर्फे सत्कार
मुरुड जंजिरा : प्रतिनिधी
मुरुड तालुका सुपारी खरेदी विक्री संघात भारतीय जनता पार्टीचे दोन संचालक निवडून येऊन एक चांगली सुरुवात मुरुडमध्ये झाल्याचा आनंद होत आहे. तसेच आता आगामी नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणूक जवळ आल्या असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडवण्याकडे अधिक लक्ष केंद्रित करावे. पक्ष आपणास निश्चित बळ देणार असून सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामास लागावे व पक्षाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे प्रतिपादन दक्षिण रायगडचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष व अलिबाग मुरुड विधानसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख राजेश मपारा यांनी केले आहे. मुरुड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते जनार्धन कंधारे व तालुका उपाध्यक्ष विनोद भगत हे मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन संचालक झाले आहेत.त्यांचा सत्कार समारंभ आज मुरुड शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात झाला. यावेळी ते मार्गदर्शन भाषणात बोलत होते.
यावेळी भाजप नेते अॅड. महेश मोहिते, मुरुड तालुका भाजप अध्यक्ष महेंद्र चौलकर, तालुका उपाध्यक्ष स्वप्नील चव्हाण, शैलेश काते, महेश मानकर, मुरुड शहर अध्यक्ष उमेश माळी, नैनिता कर्णिक, प्रवीण बैकर, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, तालुका सचिव नरेश वारगे, प्रतिभा गायकर, माजी तहसीलदार नयन कर्णिक, मुरुड तालुका सरसचिटणीस सुदामा वाघीलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सुपारी संघाचे संचालक जनार्धन कंधारे व विनोद भगत याना जिल्हा उपाध्यक्ष व ऍड महेश मोहिते यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन गौरवण्यात आले.