पनवेल : वार्ताहर
नवीन पनवेल परिसरातील सिग्नल यंत्रणा, तसेच शेअर रिक्षा व इतर नागरी असुविधांबाबत आज नवीन पनवेल शिवसेना महिला शहर संघटक अपूर्वा प्रभू यांनी आ. प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन या नागरी प्रश्नांबाबत त्यांना निवेदन सादर केले. या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यासुद्धा उपस्थित होत्या. या निवेदनात अपूर्वा प्रभू यांनी म्हटले आहे की, नवीन पनवेलला असलेले सिग्नल यांना दिला गेलेला वेळ हा जास्त असल्याने बराच गाड्या सिग्नल तोडून नियमांचे उल्लंघन करून आपली वाहने तेथून काढतात. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, तसेच सेक्टर 3 द्वारका स्वीट मार्टच्या आजूबाजूच्या परिसरातील वाहतुकींवर अंमल आणणे जरूरीचे आहे. या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि खाद्यपदार्थ सेंटर असल्यामुळे नागरिकांची तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अनेक वेळा ग्राहक वाहतुकीच्या नियमांना न जुमानता त्यांच्या गाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाकड्या तिकड्या उभ्या करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीसारखा प्रश्न निर्माण होतो, तसेच द्वारका स्वीट मार्टमध्ये जे खाण्याचे स्टॉल आहेत त्यांची भांडी दुकानाच्या बाहेर रस्त्याच्या कडेलगतच मोरी करून धुतली जातात. जेणेकरून दुर्गंधी आणि नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. नवीन पनवेल स्टेशनसमोर बिकानेर स्वीट मार्टच्या आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र दुचाकी वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग होत असते. त्यामुळे नागरिकांना व ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी अतिशय त्रास होत आहे. या समस्येंबरोबरच दिवसेंदिवस रिक्षा चालकांची मग्रुरी वाढत चालली असून, रिक्षावाले खूपच गुंडगिरी करीत असतात व ग्राहकांकडून वाटेल ते रिक्षा भाडे आकारतात. नवीन पनवेल शहरामध्ये स्टेशनपासून इतर सेक्टरमध्ये शेअर रिक्षाची सोय करण्यात यावी, तसेच लोकल बस, नवीन पनवेल, खांदा वसाहत व पनवेल शहर यामध्ये सुरू करण्यात यावी. तरी या छोट्या वाटणार्या गोष्टी, पण नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या नागरी समस्येकडे आपण जातीने लक्ष घालून त्याची पूर्तता करावी, अशी मागणी प्रभू यांनी केली आहे.