Breaking News

ताम्हिणी घाटात पशू-पक्ष्यांची भागविली जातेय तहान!

जागोजागी बसविली पाण्याने भरलेली मातीची भांडी

 

पाली : प्रतिनिधी

पाली सुधागड़सह रायगड़ जिल्ह्यात तापमानाचा पारा चढला आहे. उन्ह व उन्हांच्या काहिलिने सारे त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत पशुपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी काही निसर्गप्रेमींनी ताम्हिणी घाटात जागोजागी मातीची भांडी बसविली आहेत. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाट जैवविविधतेने नटलेला आहे. जिल्ह्यातील  विळे, भिरा, पाटणूस व भागाड या गावालगत हा घाट परिसर आहे. असंख्य पशूपक्षांच्या प्रजाती येथे नांदत आहेत. मात्र उन्हाळ्यात त्यांची पाण्यासाठी वणवण होते. ही बाब लक्षात घेऊन काही निसर्गप्रेमींनी येथील पशुपक्षांसाठी जागोजागी मातीची भांडी बसवली आहेत. यामुळे येथील पशुपक्षांची वणवण तर थांबली आहेच. शिवाय त्यांना थंड पाणीसुद्धा मिळत आहे. पावसाळ्यात ताम्हिणी घाटात असंख्य धबधबे भरभरून वाहत असतात. मात्र उन्हाळा सुरु झाला की, या घाटाला नजर लागते. वणव्यांनी ताम्हिणी घाट विद्रुप होतो. येथील पाण्याचे अनेक नैसर्गिक स्त्रोत लुप्त होतात. वैशाख महिन्यात झाडांची पानगळती झाल्याने अन्नपाण्यासाठी या घाटातील पक्षी, प्राणी, कीटक यांचा मोर्चा घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या विळे, भागाड, पाटणूस, भिरा आदी गावाकडे वळतो. या पक्षी व प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती थांबावी व अपघातदेखील रोखावेत या उद्देशाने काही अज्ञात व्यक्तींनी ताम्हिणी घाटात विविध ठिकाणी मातीची भांडी सिमेंटच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित बसवलेली आहेत. येणारे-जाणारे पर्यटक या भांड्यात पाणी टाकतात आणि मातीच्या भांड्यातील हे पाणी दिवसभर थंड राहते. या भांड्यातील पाणी पिण्यासाठी माकडे आणि पक्षी येतात तर रात्री विविध निशाचर वन्यजीव आपली तहान भागवतात, असे येथील निसर्ग अभ्यासक रामेश्वर मुंढे यांनी सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply