खोपोली : प्रतिनिधी
कोळसा वाहतूक करणार्या ट्रकचालकाला मारहाण करून त्याच्याकङून 50 हजाराची खंङणी मागणार्या सनील सुरेश गायकवाड (26, रा. कुंभिवली, खालापूर) याला खालापूर पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी तांबोळी (रा. रामवाडी, ता. पेण) यांचा चालक हा त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र. एमएच-46, बीएफ -5961) रोहा सानेगाव जेट्टीवरुन दगडी कोळसा भरुन खालापूर कुंभिवली येथे घेऊन येत असताना सुरेश गायकवाङ याने ट्रक अडवला. ट्रक चालकाला शिविगाळ व हाताबुक्क्यांनी मारहाण करीत तुला येथे धंदा करुन देणार नाही, असा दम दिला. लोखंडी रॉड उगारून पुन्हा कोळसा भरून आलास तर मारीन अशी धमकी सनिल याने ट्रकचालकाला देत कोळसा पुरवायचा असेल तर मला दर महिन्याला 50 हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली.
घाबरलेल्या ट्रक चालकाने कंपनीचे मालकांना सर्व घटना सांगितल्यावर सनिल विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी सनिल गायकवाडविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार निलेश कांबळे हे करीत आहेत.