रसायनी : प्रतिनिधी
पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीज असोसिएशन (प्रिआ)च्या वतीने मोहोपाडा परिसरात पर्यावरण जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. या रॅलीत पर्यावरणाच्या दृष्टीने नागरिकांनी कशी काळजी घ्यावी यावर जनजागृती करण्यात आली. यावेळी पाताळगंगा रसायनी परिसरातील सर्व कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पाताळगंगा रसायनी हा औद्योगिकीकरणाने नटलेला परिसर आहे. या परिसरातील सर्व कारखानदारांनी एकत्रित येऊन पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीज असोसिएशन अर्थात प्रिआची स्थापना केली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परिसरात जनजागृती व्हावी याकरिता मोहोपाडा थांब्याजवळून मोहोपाडा बाजारपेठेतून मोहोपाडा गाव तेथून पुन्हा नवीन पोसरीमार्गे जनता विद्यालय ते प्रिआ स्कूल अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत असोसिएशनच्या वतीने नागरिकांना संदेश देण्यात आला. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्या बंद करा, झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीज असोसिएशनचे कृष्णराव ओंकार, अनिल घेवारे आदींसह विविध कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.