रेवदंडा : प्रतिनिधी
प्रस्ताविक प्रकल्पाकरिता रोहा व मुरूड तालुक्यातील काही गावांच्या जमिनी संपादित करण्यासाठी शासनाच्या वतीने नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. त्यास स्थानिकांचा विरोध आहे. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाधितांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याची तयारी करावी, असे आवाहन भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी तळेखार येथे केले. रोहा व मुरूड तालुक्यातील वाघुळवाडी, आमली, येसदे, शिरगाव, वळके, सार्तिडे, चोरढे, वेताळवाडी, तळेखार, तळे, शिवगाव आदी गावांतील जमिनी संपादित करण्यासाठी शासनाच्या वतीने संबंधित शेतकर्यांना नोटीसा जारी केल्या आहेत. बाधितांनी सर्वपक्षीय शेतकरी व मच्छीमार संघर्ष समिती स्थापन करून या भूसंपादनास विरोध दर्शविला आहे. संघर्ष समितीच्या वतीने वाघुलवाडी ते तळेखार भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीची सांगता तळेखार येथे झाली. त्या वेळी अॅड. महेश मोहिते बोलत होेते. शेतकरी व मच्छीमार संघर्ष समितीने काढलेल्या रॅलीत समितीच्या सर्व सदस्यांसह भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, काँग्रेसचे अॅड. प्रवीण ठाकूर, महेंद्र जैन, मनसेचे महेश कुन्नमल, शिवसेनेच्या जि.प. सदस्य राजश्री मिसाळ आदी पक्षीय नेते मंडळींसह वाघुलवाडी ते तळेखारदरम्यान गावांतील सुमारे एक हजार मोटरसायकलस्वार सहभागी झाले होते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापची नेतेमंडळी उपस्थित नव्हती. वाघुलवाडी येथून या मोटरसायकल रॅलीस सुरुवात झाली. या वेळी ‘एमआयडीसी हटवा, शेतकरी वाचवा’, ‘रद्द करा, रद्द करा, एमआयडीसी रद्द करा’ अशा घोषणांनी वाघुलवाडी ते तळेखार रस्ता दणाणून गेला. वाघुलवाडी, आमली, येसदे, शिरगाव, वळके, सार्तिडे, ताडगाव, ताडवाडी चोरढे, तळेखार या गावांतील महिलांनी रस्त्याच्या दुर्तफा उभे राहून मोटरसायकल रॅलीला प्रतिसाद दिला. या रॅलीची सांगता तळेखार येथे झाली. या वेळी भाजपचे अॅड. महेश मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेचे प्रास्ताविक संघर्ष समितीचे राजेंद्र सुतार यांनी केले. एमआयडीसीच्या प्रास्ताविक प्रकल्पाने येथील शेतकरी व मच्छीमार उद्ध्वस्त होणार असून सुजलाम् सुफलाम् परिसर नष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. अॅड. प्रवीण ठाकूर, राजश्री मिसाळ, महेंद्र जैन आदींनी मनोगत व्यक्त केले. सभेचे सूत्रसंचालन पं. स. उपसभापती चंद्रकांत मोहिते यांनी केले. मोटरसायकल रॅलीदरम्यान रेवदंडा पोलिसांनी चोख बदोबस्त ठेवला होता.