खारघर : प्रतिनिधी : श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिर पनवेलच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मी आणि आमची वाद्ये या वाद्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी येथील फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. या वेळी पनवेलकरांनी वाद्यांच्या मैफलीचा आनंद घेतला. सारेगम फेम म्युझिकल टीमने सादर केलेल्या विविध वाद्यांच्या संगीत मैफलींनी पनवेलकर या वेळी मंत्रमुग्ध झाले.
पनवेलमध्ये प्रथमच केवळ वाद्यावर आधारित संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पनवेलकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. केवळ संगीतावर आधारित या कार्यक्रमात बासरी, ढोलकी, पियानिका, तबला, ऑक्टॉपॅड आदींची जुगलबंदी पाहावयास मिळाली. मराठी सिनेसृष्टी अथवा लोकसंगीतात गाजलेले प्रभो शिवाजी राजा, मन उधाण वार्याचे, हिंदी चित्रपटसृष्टीमधील गाजलेले हीरो चित्रपटाचे बासरी टायटल गीत, महाराष्ट्रभर गाजलेले सारेगमप या संगीतमय कार्यक्रमाचे टायटल गीत, गोमू संगतीन माझ्या तू येथील का? आदींसह विविध प्रकराची अजरामर झालेली गीते केवळ वाद्यांच्या सुरावर सादर केली. ढोलकीवादक नीलेश परब, बासरीवादक अमर ओक, पियानिका वादक सत्यजित प्रभु, तबलावादक आर्चिस लेले आणि ऑक्टॉपॅड वादक दत्ता तावडे यांनी ही संगीताची मैफल फुलविली. प्रत्येक कलाकाराने आपल्या वाद्याची कलाकृती सादर केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेते सुनील बर्वे यांनी जबाबदारी पार पाडली. या कार्यक्रमाच्या सुरुवातील श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक ट्रस्टच्या कार्याची माहिती देण्यासाठी चित्रफीत प्रेक्षकांना दाखविण्यात आली.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली. यामध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, चंद्रशेखर सोमण आदींसह ज्येष्ठराज सिद्धिविनायक ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.