Breaking News

मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात पनवेलमधील कवींच्या कविता

पनवेल : प्रतिनिधी : पनवेलचे ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख आणि ज्येष्ठ कवी रोहिदास पोटे यांची कविता या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठाने एफवायबीएच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी अभिनंदन केले.

गजलकार ए. के. शेख यांची ‘घरट्यासाठी झिजतो, कुढतो, मरतो माझा बाप’ ही गजल मुंबई विद्यापीठाने एफवायबीएच्या मराठी अभ्यासक्रमात या शैक्षणिक वर्षापासून घेतली आहे. ए. के. शेख हे ज्येष्ठ गजलकार व समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. गजलचा प्रचार आणि प्रसार यासाठी त्यांनी वाहून घेतले आहे. त्यांच्या नावावर अनेक गजलसंग्रह, कवितासंग्रह व समीक्षेची पुस्तके आहेत. ‘अमृताची पालखी’ हा मराठीतील पहिला गजल दिवान त्यांच्या नावावर आहे. ही गझल त्यातूनच घेतली आहे. राष्ट्रीय, राज्य व अनेक संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. रत्नागिरी येथे भरलेल्या अ. भा. मराठी मुस्लिम साहित्य संमेलनाचे व सोलापूर येथे भरलेल्या अ. भा. गजल साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

रोहिदास पोटे कवी, गझलकार, स्तंभलेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची ‘विचारावा अर्थ’ ही कविता मुंबई विद्यापीठाने एफवायबीएच्या मराठी अभ्यासक्रमात चालू शैक्षणिक वर्षापासून घेतली आहे. ही कविता त्यांच्या ‘मन आभाळून आलं’ या काव्यसंग्रहातून घेतली आहे. या काव्यसंग्रहाला अनेक राज्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा ‘स्वप्नातले किनारे’ हा गजलसंग्रह प्रकाशित झालेला आहे. ते महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण सहसंचालक आहेत.कविता आणि गजलबरोबरच त्यांनी वर्तमानपत्रात   लेखन केले आहे. साप्ताहिक सदरातून केलेल्या लेखनाचे त्यांंचे दोन लेखसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या द्वितीय भाषा मराठी पाठ्यपुस्तकात ‘प्रलय’ नावाची कविता गेल्या अभ्यासक्रमात होती. साहित्य, शिक्षण व समाजसेवा क्षेत्रातील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply