अलिबाग ः प्रतिनिधी
दुसरा शनिवार आणि रविवारमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांवर पर्यटकांचे उधाण आले होते. अलिबाग, वरसोली, आक्षी, नागाव, काशीद, किहीम, मुरूड, श्रीवर्धन, दिवेआगर हे सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले होते. त्यामुळे या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडीदेखील झाली होती. शहरातील धावपळीच्या जगण्यातून दोन दिवस विश्रांती म्हणून पर्यटक मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यात येतात. अलिबाग, रेवदंडा, किहीम, काशिद, मुरूड, नागाव, आक्षी समुद्रकिनार्यांना पर्यटकांची पसंती मिळत आहे. शनिवार आणि रविवारी येथे मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी दिसून आली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रवासी जलवाहतूक सेवा बंद करण्यात आल्यामुळे रविवारी परतीच्या प्रवासात पर्यटकांचे हाल झाले. एसटीवरही अतिरिक्त ताण पडला. पर्यटकांच्या गाड्या मोठ्या संख्येने आल्यामुळे समुद्रकिनारे असलेल्या गावांमध्ये वाहतूक कोंडी झाली होती.