खासदार श्रीरंग बारणे यांचा आज जाहीर सत्कार
खोपोली : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत मतदारांनी देशाचे हित, राष्ट्रीय भावना त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून मतदान केल्याने महायुतीचा म्हणजेच लोकशाहीचा विजय झाल्याचे प्रतिपादन भाजप नेते व माजी आमदार देवेंद्र साटम यांनी केले.
लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा जाहीर सत्कार त्याचप्रमाणे त्यांची लोकसभेतील जबाबदारी, अशा कार्यक्रमाची रुपरेषा सांगण्यासाठी येथील भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र साटम बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यप्रमाणालीचा देशभरातील मतदारांवर प्रभाव पडला असून, त्याचे प्रतिबिंब मतदानातून दिसून आले, असे देवेंद्र साटम यांनी या वेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात जगभरात देशाची प्रतिमा उंचावण्याचे महत्वाचे काम केले. तसेच देशातील सार्या जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन विकासाचे काम केले आहे, असे साटम म्हणाले. भाजप व शिवसेना महायुतीच्या वतीने गुरुवारी (दि. 13) खासदार श्रीरंग बारणे यांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार मनोहर भोईर यांच्यासह मान्यवर नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती देवेंद्र साटम यांनी या वेळी पत्रकारांना दिली.
या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा सचिव सूर्यकांत देशमुख, शहराध्यक्ष श्रीकांत पुरी, शहर उपाध्यक्ष कृष्णा पाटील शहर सरचिटणीस दिलीप पवार, तालुका सचिव प्रशांत पाटील, मिडीया सेलचे राहूल जाधव, प्रिन्सी कोहली आदी उपस्थित होते.