Breaking News

खासदार बारणेंचा सचिव असल्याचे सांगून फसवणूक

पनवेल : बातमीदार : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचा खासगी सचिव असल्याचे सांगून एका भामट्याने अनेकांकडून लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. किरण उर्फ बंटी महाडिक असे त्याचे नाव आहे. उरण पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या भामट्याविरोधात सध्या पाच-सहा तक्रारी प्राप्त झाल्या असून खासदार बारणे यांच्या नावाने किती जणांची फसवणूक केली याचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली.

या घटनेतील तक्रारदार महेश प्रल्हाद शेट्ये (37) हा उरणमधील विजयनगर कामठा येथील चिंतामणी सोसायटीत राहण्यास असून त्याचा अ‍ॅक्वागार्ड विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय आहे. या प्रकरणातील आरोपी बंटी महाडिक हा ऑक्टोबर 2018मध्ये चिंतामणी सोसायटीत राहण्यास आला होता. त्या वेळी चिंतामणी सोसायटीचा बिल्डर राजू शहा याने बंटी महाडिक हा मावळ मतदारसंघातील खासदार श्रीरंग बारणे यांचा खासगी सचिव असल्याचे सांगत त्याची सगळ्यांशी ओळख करून दिली होती. नोव्हेंबर 2018मध्ये चिंतामणी सोसायटीत आयोजित दिवाळीसंध्या कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग बारणे हे निमंत्रित होते, मात्र काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत, पण दुसर्‍या दिवशी बंटी महाडिक हा श्रीरंग बारणे यांना सोसायटीमध्ये घेऊन आला होता. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला.

तक्रारदार महेश शेट्ये याला बंटी महाडिकने मावळ मतदारसंघामध्ये अ‍ॅक्वागार्ड मशीन लावण्याची एजन्सी   मिळवून देण्याचे आश्वासन देतानाच विविध कारणास्तव महेशकडून दोन वेळा प्रत्येकी 25 हजारांची रक्कम घेतली. निविदा मिळविण्यासाठी एक लाख रुपये भरावे लागतील, असे सांगून महेशकडून एक लाखाची रक्कम घेतली, मात्र त्यानंतरदेखील त्याने अ‍ॅक्वागार्डची एजन्सी मिळवून न दिल्याने महेशने बंटीकडे पैसे परत मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे बंटीने चिंतामणी सोसायटीतील घर सोडून महेशसोबत संपर्क तोडला. त्यानंतर बंटीने चिंतामणी सोसायटीतील अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे महेशला समजले. अखेर चिंतामणी सोसायटीतील फसवणूक झालेल्या रहिवाशांनी मार्चमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन सारा प्रकार कथन केला असता किरण उर्फ बंटी महाडिक नामक कुणीही व्यक्ती त्यांचा खासगी सचिव नसल्याचे त्यांनी सांगितले, तसेच त्याच्याविरोधात सोसायटीतील रहिवाशांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार महेश व इतरांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply