Breaking News

यंदाची ‘मौका मौका’ जाहिरात होतेय ट्रोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

इंग्लंडमध्ये सुरू असणार्‍या क्रिकेट विश्वचषकात रविवारी म्हणजेच 16 जून रोजी धमाकेदार सामना पाहण्याचीच तयारी सर्वत्र सुरू असल्याचे दिसत आहे. कारण भारत आणि पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच्या या वातावरणात सर्वाधिक चर्चेत आहे ती म्हणजे ‘मौका… मौका’ जाहिरात. 2015 पासून सुरू झालेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या या ‘मौका…’ जाहिरातींचं क्रीडारसिकांमध्ये वेगळं स्थान आहे. मुळात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये असणारी लढत पाहता याच धर्तीवर या कलात्मक जाहिराती साकारण्यात येतात. ज्यांना प्रचंड लोकप्रियता मिळते.

यंदाच्या वर्षासाठीही या दोन्ही संघांच्या सामन्याचं औचित्य साधत ही जाहिरात साकारण्यात आली, पण या वेळी मात्र जाहिरातीची प्रशंसा होण्यापेक्षा किंवा ती अधिकाधिक व्हायरल होण्यापेक्षा ट्रोलिंगचीच शिकार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 16 जून रोजी ‘फादर्स डे’सुद्धा असल्यामुळे याचा संदर्भ जाहिरातीतही देण्यात आला आहे, पण यावेळी मात्र विनोदाची ही शैली नेटकर्‍यांना आणि क्रीडारसिकांना काही रुचलेली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच या जाहिरातीवर नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर याआधीच्या जाहिराती निव्वळ मनोरंजनात्मक होत्या, ही बाब अधोरेखित करत त्या तुलनेत ही नवी जाहिरात मात्र नकारात्मक वाटत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आतापर्यंत लाखोंच्या संख्येवर पाहिल्या गेलेल्या या जाहिरातीची विनोदी शैली ही चिथावणीखोर असल्याचेही काही नेटकर्‍यांचे म्हणणे आहे. दरम्यान, याविषयी संबंधित वाहिनीकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply