लंडन : वृत्तसंस्था
पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना रद्द झाल्यानंतर सर्वांचे लक्ष रविवारच्या लढतीकडे लागले आहे. येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान हे पक्के शेजारी अन् कट्टर वैरी समोरासमोर येणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत या प्रतिस्पर्धींचा सामना पाहण्याची संधी कोणीच दवडू इच्छित नाही. या महत्त्वाच्या सामन्यासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं भारतीय संघाला एक मास्टरप्लॅन दिला आहे.
रविवारच्या सामन्यात मोहम्मद आमीर आणि वाहब रियाज हे गोलंदाज भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरतील, असे मत 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य असलेल्या तेंडुलकरने व्यक्त केले आहे. तो म्हणाला, ‘भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सर्वाधिक अनुभवी फलंदाज आहेत आणि पाकिस्तानने त्यांच्या विरोधात नक्की रणनीती तयार केली असेल. आमिर व रियाज हे दोघंही रोहित व विराटची विकेट घेण्यासाठी प्रयत्न करतील, परंतु त्याच वेळी रोहित व विराट त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज असतील. माझा सल्ला असा आहे की अन्य खेळाडूंनी त्यांना साथ द्यावी.’
आमिरनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट घेत विक्रमी कामगिरी केली. तेंडुलकरने आमिरच्या गोलंदाजीचे कौतुक केले. ‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध आमिरचा पहिला स्पेल अचूक होता. अॅरोन फिंचची त्यानं तारांबळ उडवली होती. त्याचा सामना करताना भारतीयांनी सकारात्मक दृष्टिकोनानं खेळावं. त्याच्या विरोधात काहीही वेगळं करण्याची गरज नाही. संयम बाळगा,’ असे तेंडुलकर म्हणाला.
वर्ल्डकप स्पर्धेतील ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती तो भारत-पाकिस्तान सामना अवघ्या एका दिवसानंतर होणार आहे. भारत-पाकिस्तान म्हटलं की ठसन आलीच… ती मैदानावरही असते आणि मैदानाबाहेरही, पण हा सामना सुरू होण्यापूर्वीच दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये जोरदार संघर्ष झालेला पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानच्या शोएब अख्तरने या सामन्यासाठी भारतीय संघाच्या सांगण्यानुसार खेळपट्टी तयार करण्यात आल्याचा आरोप केला. त्यावर भारताच्या वीरेंद्र सेहवागने दिलेले उत्तर ऐकून अख्तरची बोलतीच बंद झाली. जाणून घेऊ या नक्की काय घडलं?
सध्याच्या गुणतालिकेनुसार भारतीय संघ पाच गुणांसह तिसर्या, तर पाकिस्तान तीन गुणांसह आठव्या स्थानावर आहे. भारत-पाक सामन्यापूर्वी अख्तर व सेहवाग हे एका यू ट्युब चॅनेलवर आमनेसामने आले आणि त्यात हा वाद झाला. भारताने या वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांना हवी तशी खेळपट्टी बनवून घेतली आहे, असे मत अनेक क्रिकेटपटूंनी व्यक्त केलं आहे. हे असं कसं असू शकतं. ही गोष्ट खरी आहे का? अख्तरच्या या प्रश्नावर सेहवाग खवळला. तो म्हणाला, ‘हे तथ्य असल्याचे तुलाही वाटते. लोकांचे कामच ते आहे. मी एवढेच म्हणेन, हत्ती डौलाने चालत असताना कुत्रे भुंकत असतात. खेळपट्टी कशी असावी, हे आमच्या हातात असते तर त्यावर जराही गवत दिसले नसते.’